राज ठाकरे ‘इफेक्ट’?; गृहमंत्र्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत दिली महत्त्वाची माहिती – home minister dilip walse patil gave important information about the loud speakers on the mosque
मुंबई : मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. हे भोंगे न हटवल्यास मनसेच्या कार्यकर्त्यांनी मशिदीसमोरच हनुमान चालिसा वाजवावी, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. यासाठी राज ठाकरे यांनी पोलीस प्रशासनाला ३ मेपर्यंताच अल्टिमेटमही दिला आहे. राज यांच्या या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून मशिदीवरील भोंग्यांबाबत (Loud Speaker Azaan) लवकरच राज्य सरकारकडून महत्वपूर्ण निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रासह देशात मशिदीवरील भोंग्यांना विरोध होत असल्याने अनेक ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील स्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं आहे. तसंच कुठेही तणाव निर्माण झाल्यास स्थानिक पोलीस योग्य तो निर्णय घेतील, असंही वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भोंग्यांवरून वातावरण तापलं असतानाच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्येही बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.