मुंबई: धारावीतील प्रत्येक नागरिकाची करोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी हा निर्णय घेतला. खासदार शेवाळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, धारावीतील दीडशे खासगी डॉक्टरांनी पालिकेच्या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दाखविल्याने येत्या १० ते १२ दिवसांत संपूर्ण परिसरातील नागरिकांची करोना चाचणी करणे पालिकेला शक्य होणार आहे.

सहाय्यक आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीत, खासदार शेवाळे, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, इंडियन मेडिकल काउन्सिलचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचनेकर, डॉ. सुरेंद्र सिगनापुरकर यांसह स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

धारावीवरील करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टरांनी पालिकेच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार शेवाळे यांनी केले होते. या आवाहनाला, इंडियन मेडिकल काउन्सिल आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं सकारात्मक प्रतिसाद दिल्याने, धारावीतील दीडशे खासगी डॉक्टर पालिकेच्या मोहिमेत सहभागी होणार आहेत. “दोन खासगी डॉक्टर आणि तीन पालिका वैद्यकीय कर्मचारी असे पाच जणांचे पथक सुमारे पाच हजार नागरिकांची चाचणी करणार आहे. अशा पथकांच्या माध्यमातून १० ते १२ दिवसांत धारावीतील सुमारे साडेसात लाख नागरिकांची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा रीतीने त्वरित निदान झाल्यास बाधितांना धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये उपचारासाठी दाखल केले जाईल, तर लक्षणे आढळणाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात येईल,” असे शेवाळे यांनी सांगितले. याचबरोबर, धारावी पोलीस ठाणे आणि रुग्णालयांच्या ठिकाणी सॅनिटायझर टनेलही लवकरच उभारण्यात येणार असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here