अफगाणिस्तानात तालिबान सरकार आल्यानंतर पाकिस्तानशी संबंध बिघडले आहेत. आशिया टाईम्सच्या रिपोर्टनुसार १४ एप्रिलला अफगाणिस्तान सैन्यानं ३५ राऊंड गोळे टाकले. तर, चित्राल भागात पाकिस्तानच्या चौक्यांवर गोळीबार केला. हा हल्ला जवळपास ६ तास सुरु होता. याच्या प्रत्युत्तरात पाकिस्ताननं मध्यरात्री ३ वाजता फायटर जेट विमानं पाठवून एअर स्ट्राईक केला. अफगाणिस्तानातील खोस्त आणि कुनार भागात टीटीपी सह हाफिज गुल बहादरच्या ठिकाणांवर बॉम्बचा वर्षाव केला.
पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात महिला आणि मुलांसह एकूण ५० जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही दहशतवादी संघटना पाकिस्तान सरकारचा विरोध करतात आणि लष्करावर हल्ले करतात. टीटीपीनं पाकिस्तानचे ७ जवान मारल्यानं एअर स्ट्राईक करण्यात आल्याची माहिती आहे. दुसरीकडे तालिबान सरकारनं टीटीपी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा दावा फेटाळला आहे.
पाकिस्तान सरकारकडून ड्युरंड सीमेवर कुंपण करण्यात येत आहे. त्याला अफगाणिस्तानचा विरोध आहे. अफगाणिस्तानातील यापूर्वीच्या सरकारांनी देखील याचा विरोध केला होता. जानेवारी महिन्यात तालिबानच्या हल्ल्यामुळं पाकिस्तान सैन्याला अपयश आलं होतं. दोन्ही देशांमधील वाद आणि कारवाया वाढत चालल्या असून सीमाप्रश्न आणखी एका युद्धास कारणीभूत ठरु शकतो.
पाकिस्ताननं गेल्या काही दिवसात ५ ठिकाणी एअरस्ट्राईक केले होते. यामध्ये कुनार, बाजौर पाकटीका, वजीरिस्तान आणि खोस्तचा समावेश आहे. मात्र तालिबान सरकारनं त्यांच्या विरोधात लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानं तालिबान भडकला आहे. आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. पुन्हा अशी घटना घडल्यास चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा अफगाणिस्ताननं दिला आहे. अफगाणिस्ताननं दुसरीकडे दक्षिण वजीरिस्तानमध्ये भिंत बांधण्याचं काम सुरु आहे. अंगोर अड्डा बॉर्डर क्रॉसिंग बंद करण्याचा हेतू यामागं आहे.