नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. प्रशांत किशोर यांची सोनिया गांधी यांच्यासोबतची मागील चार दिवसांतील ही तिसरी भेट आहे. त्यामुळे किशोर यांचा काँग्रेस निश्चित झाला आहे का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. (Prashant Kishor Congress Entry)

प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत देशभरातील विविध पक्षांची रणनीती ठरवून त्यांना निवडणुकीत विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस, आंध्र प्रदेशमध्ये जगन मोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेससह इतर राजकीय पक्षांचा समावेश आहे. मात्र मागील काही दिवसांपासून किशोर यांची काँग्रेसच्या नेतृत्वासोबत जवळीक वाढली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून काँग्रेसची रणनीती कशी असावी, याबाबत प्रशांत किशोर यांची सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर काँग्रेस नेतृत्वाकडून किशोर यांच्यासमोर पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-राष्ट्रवादी युती?; पवार-ठाकरेंमध्ये झाली चर्चा

प्रशांत किशोर यांनी केवळ निवडणूक रणनीतीतज्ज्ञ म्हणून नव्हे तर थेट पक्षात प्रवेश करून काम करावं, अशी गांधी कुटुंबाची इच्छा असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच प्रशांत किशोर यांची गांधी कुटुंबातील सदस्यांसह काँग्रेसच्या इतर दिग्गज नेत्यांसोबतही बैठक झाली होती. त्यानंतर प्रशांत किशोर हे आज पुन्हा एकदा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी १० जनपथ या निवासस्थानी दाखल झाल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी काय आहे प्रशांत किशोर यांचा प्लान?

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वासमोर एक प्लान ठेवला आहे. त्यानुसार काँग्रेसने लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ३७० जागांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचं म्हटलं. तसंच महाराष्ट्र आणि तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये काँग्रेसने एकटं न लढता मित्रपक्षांसोबत हातमिळवणी करावी, असं प्रशांत किशोर यांचं मत आहे. किशोर यांच्या या प्लानवर सध्या काँग्रेस पक्षात खलबतं सुरू असून पुढील आठवडाभरात पक्षाकडून प्रशांत किशोर यांच्या प्रवेशाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असं काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.
…………………………………………………………..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here