वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी जो भाग यूक्रेनच्या आहेत त्यापैकी कोणताही भाग आम्ही रशियाला देणार नाही. जे भाग आमचे नाहीत त्यांची आम्हाला गरज नाही, असं म्हटलं आहे. यादरम्यान रशियानं लवीव शहरात हल्ले केले आहेत. रशियन क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. लवीवमध्ये यूक्रेनमधील विस्थापित लोक वास्तव्यास होते. त्या भागात रशियानं हल्ला केला आहे. आतापर्यंत रशिया पूर्व यूक्रेनवर हल्ला करत होता. आता मात्र, रशियानं वेगवेगळ्या भागात हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.
मारियुपोलमध्ये रशियाच्या सैन्याकडून यूक्रेनच्या सैन्याला शरण येण्यासाठी इशारा देण्यात आला आहे. मारियुपोलमधील स्टील कंपनीत यूक्रेनचे सैनिक थांबले आहेत. मारियुपोलमधील अजोव रेजिमेंटचे डेनयस प्रोकोपेंको यांनी रशियन सेन्य अजोवस्तल स्टीलवर्क्स कंपनीवर जाणीवपूर्वक हल्ले करत असल्याचं म्हटलं आहे. या स्टील कंपनीत सैन्यदलाच्या तुकडीसह लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी आश्रय घेतला आहे.
यूक्रेनच्या सैन्य दलाच्या कमांडरनं याविषयी अधिक माहिती दिली आहे. रशियन सैन्य आणि लुहान्स्क पीपल्स रिपब्लिक च्या सदस्यांना या ठिकाणी सामान्य नागरिकांनी आश्रय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे ते हल्ला करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशियाकडून स्टील कंपनीवर रॉकेट, बॉम्ब हल्ले करण्यात येत आहेत. मारियुपोल शहराला रशियन सैन्याकडून बेचिराख करण्यात आलं आहे.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे यूक्रेनच्या दौऱ्यावर जाण्याची कोणतीही योजना नसल्याचं व्हाईट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अमेरिकेचं लक्ष यूक्रेनला मदत करण्याचं आहे. रशियन सैन्य यूक्रेनच्या नागरिकांविरोधात दहशत पसरवत आहे, असा आरोप व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी केला आहे.