मुंबई: राज्यातील करोनाचा धोका अधिकच वाढला आहे. आज दिवसभरात करोनाच्या संसर्गानं २५ जणांचा बळी गेला आहे. तर २२९ रुग्णांची नव्यानं नोंद झाली आहे. त्यामुळं करोनाबाधितांची एकूण संख्या १३६४ झाली आहे. राज्यातील मृतांचा आकडा आता शंभराच्या जवळपास पोहोचला आहे.

मुंबईमधील करोनाबाधितांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. मुंबईतील काही दाटीवाटीच्या लोकवस्तीतील लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री यांनी गुरुवारी दिली. राज्यात करोनाबाधित रुग्णांचा आकडा १३६४ असून, त्यात ५० टक्यांपेक्षा अधिक म्हणजे ८७६ रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईमधील रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय असून, त्यासाठी वेगळी रणनीती आखली जात असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन १०० टक्के नेटाने राबविणे हा एकमात्र उपाय असून, त्यासाठी नवी रणनिती आखली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलीस विभागाने जरुर चांगले काम केले आहे. पण काही भागात लॉकडाऊन व संचारबंदी प्रभावी करण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बोलाविण्याशिवाय पर्याय नाही. दाट लोकवस्ती आणि गर्दीच्या भागात प्रभावीपणे संचारबंदी करण्याची गरज आहे. राज्य राखीव पोलीस दल, मुंबई पोलीस, सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं गर्दीवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे, असे टोपे म्हणाले.

मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीच्या अनुषंगाने करोनाला रोखण्यासाठी काही निर्णय घेतले गेले. राज्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. त्यामुळे काही भागात राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येतील, असे स्पष्ट संकेत टोपे यांनी दिले. मुंबईतील राज्य मंत्रिमंडळातील सदस्य प्रा. वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांच्याशीही चर्चा झाली. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मुंबईतील परिस्थितीचे सादरीकरण केले. धारावीत भेट दिल्यानंतर सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा ठिकाणी प्रत्येकी दोन तासांनी अग्निशमन दलातर्फे सॅनिटायजेशन करणे तसेच ड्रोन तंत्रज्ञानाने सॅनिटायजेशन करणे असा उपाय करावा लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

हातावर पोट भरणारे, लहान मोठे उद्योग करणाऱ्या मंडळींचा जेवणाचा प्रश्न आहे. इस्कॉन, श्री श्री रविशंकर अथवा अन्य स्वयंसेवी संस्थांकडून तयार अन्न येत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन सरकारतर्फे कम्युनिटी किचन सुरू करुन लोकांना घरोघरी घरपोच जेवण देण्याचा प्रयत्न आहे. अनेक भागात दहा बाय दहाच्या खोलीत १५ लोक राहत असतात. त्यामुळे त्या घरातील अनेक लोक घराबाहेर रस्त्यावर असतात. अशांसाठी त्या भागातील शाळांच्या खोल्यामध्ये जागा देण्याचा विचार आहे. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या चिंताजनक असल्यामुळे सरकारला करोना निवारणाच्या कामात मुंबईकरांनी मदत करावी. अत्यंत कडक पद्धतीने लॉकडाऊन अंमलात आणल्याशिवाय पर्याय नाही, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here