दहावी इयत्तेतील एका दलित विद्यार्थ्याला मारहाण करून एकाचे तळवे चाटायला भाग पाडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली असल्याचे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. (Dalit Atrocities)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगतपूर शहरात राहणाऱ्या या मुलाला १० एप्रिल रोजी त्याच्या मित्रांनी मोटरसायकलवरून रामलीला मैदानात नेले. नंतर त्याला सलोन रोडच्या दिशेने नेले. तिथून काही तरुणांनी या मुलाला एका उद्यानात नेऊन मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने या मुलाला आपल्या पायाचे तळवे चाटायला भाग पाडले. यापैकी एकाने या सर्व घटनेचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर प्रसारित केले.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित मुलाने आईसह कोतवाली पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मात्र मुलाला मारहाण का करण्यात आली याचे कारण पोलिसांनी स्पष्ट केले नाही. या प्रकरणी विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला असून आठ आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे, अशी माहिती डलमऊचे क्षेत्राधिकारी अशोक सिंह यांनी दिली.