मुख्यमंत्र्यांनी आज सिंधुताईंशी फोनवरून संवाद साधला. यावेळी सिंधुताईंनी उद्धव यांचं तोंडभरून कौतुक केलं. मी उद्धव बोलतोय, असे मुख्यमंत्री म्हणताच, ‘बाळासाहेबांच्या पिल्ल्या बोल’ असा प्रतिसाद सिंधुताईंनी दिला. आपल्यावतीने व्हॉट्सअॅप मेसेज मिळाला. तुमचे आशीर्वाद मला बळ देणारे आहेत, असे उद्धव म्हणाले असता सिंधुताईंनी उद्धव यांच्याबद्दलच्या आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या.
‘बाळासाहेबांचं आणि मीनाताईंचं रक्त आहे तुझ्यात. तू अगदी धीराने साऱ्या परिस्थितीला तोंड देतोयस. तुझ्याएवढा सिंपल मुख्यमंत्री मी कुठेही पाहिला नाही. मुख्यमंत्री होऊनही तुझ्यात कोणताच बदल झाला नाही. अगदी साधेपणाने वागतोस. वाटलं नव्हतं तू इतका खंबीर होशील पण महाराष्ट्रावर आलेल्या प्रसंगाला तू धैर्याने सामोरा जातोयस. केवढी आव्हानं आहेत तुझ्यापुढे लेकरा…अवघा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर आहे…अशा शब्दांत सिंधुताईंनी उद्धव यांच्या नेतृत्वाला दाद दिली. हे संकट दूर झाल्यावर, सगळं काही निवळल्यावर तुला भेटायला येईन, असेही सिंधुताई म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांनीही सिंधुताईंचं बोलणं नम्रपणे ऐकून घेतलं. तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. कुठेही बाहेर जाऊ नका, असे मुख्यमंत्र्यांनी सिंधुताईंना सांगितलं. मी आहे तसाच आहे. आम्ही एकदा ठरवलं की कधीही माघार घेत नाही. ही जबाबदारीही समर्थपणे पेलणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निश्चितच आम्ही या संकटावर मात करणार आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सिंधुताईंना आश्वस्त केलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times