तालुकाध्यक्ष राहुल वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन…
गंगापूर शहरात बारा-बारा दिवस पिण्याचे पाणी येत नसल्याचा आरोप करत, एमआयएम तालुकाध्यक्ष राहुल वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली कायगाव येथील गोदावरीच्या नदीच्या काठावर आंघोळ आंदोलन केले आहे. यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी सोबत आणलेल्या बादलीमध्ये गोदावरी नदीतून पाणी घेत डोक्याला साबण लावून अंघोळ करून हटके आंदोलन केले आहे. यावेळी गंगापूर नगरपालिकेच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली.
तर एमआयएमने गंगापूर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, गेल्या अनेक महिन्यापासून गंगापूर शहरातील पाणीपुरवठा नियोजन ढिसाळ असल्याने शहरात तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे अनेकदा प्रशासनाकडे पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली, पण त्याकडे प्रशासनाकडून कानाडोळा केला जात असल्याचा आरोप एमआयएमने केला आहे.