करोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयाच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. जिल्हा ओलांडून कोणालाही प्रवेश दिला जात नाही. असे असतानाही बुधवारी रात्री कपिल वाधवान यांनी आपल्या कुटुंबातील ९ सदस्य तसेच वाहनचालक, खानसाम व इतर १४ कर्मचारी यांना घेऊन खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला. रात्री उशिरा हे सर्वजण महाबळेश्वरमधील बंगल्यात दाखल झाले. विशेष म्हणजे या प्रवासात त्यांना कुठेही अडवण्यात आले नाही. दरम्यान, याबाबत महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी माहिती मिळाली आणि त्यांनी तातडीने ही माहिती तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांना दिली. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं.
जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन करून जर कोणी जिल्हयात दाखल झालं तर अशा लोकांच्या बाबतीत काय करायचे, या बाबत राज्य शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या कुटुंबाला तसेच अन्य सर्वांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार तहसीलदार पाटील यांनी महाबळेश्वरहून या सर्वांना पांचगणी येथे हलविण्याचे निश्चित केले. आज सकाळी संबंधित बंगल्यावर तहसीलदार पाटील अन्य अधिकारी-कर्मचारी व वैदयकीय अधिकाऱ्यांसह दाखल झाल्या. मुख्याधिकारी अमिता दगडे पाटीलही सोबत होत्या. बंगला तातडीने बंद करण्यात आला. तसेच बंगल्यातील सर्वांची डॉक्टरांनी तिथेच तपासणी केली. त्यात करोनासदृष्य लक्षणे कुणातही आढळली नाहीत.
सुरुवातीला तिथून निघण्याची वाधवान कुटुंबाची तयारी नव्हती. मात्र, प्रशासन ठाम राहिल्याने त्यांना सामानाची आवराआवर करावी लागली. त्यानंतर ठरल्यानुसार दुपारी बारा वाजता या सर्वांची रवानगी पाचगणीला करण्यात आली. वाधवान कुटुंबाच्या सहा गाड्या आणि त्यामागे तहसीलदारांची गाडी असा ताफा निघाला आणि हिरडा नाका, वेण्णा लेकमार्गे पाचगणीला पोहचला. तिथे शासनाच्या इमारतीत या सर्वांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. पुढील १४ दिवस याच इमारतीत सर्वांना राहावे लागणार आहे. तिथे पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times