संवाद ऐकण्यात अडचणनाटक सुरू असताना कलाकाराचे संवाद प्रेक्षकांना ऐकायला आले पाहिजे. अनेक नाट्यगृहांत ही अडचण जाणवते. वाशीच्या विष्णुदास भावे या नाट्यगृहात आमच्या नाटकाचा नुकताच प्रयोग झाला. तिथेही आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नव्हता. नाट्यगृह बंद असताना तेथील आवश्यक कामं केली गेली; पण त्याचा परिणाम म्हणावा तसा दिसत नाही. नाट्यगृहातील व्यवस्थापक मंडळ स्वतःहून सगळी कामं करतात; पण त्यातील तज्ज्ञांना बोलावून विशिष्ट कामं होणं गरजेची आहेत.

खटकणारी बाब – विष्णुदास भावे नाट्यगृहात तांत्रिक गोष्टींतील बिघाड, नाट्यगृहातील अस्वच्छता

काय करायला हवं? – स्वच्छतेकडे लक्ष देणे, तज्ज्ञांना बोलावून तांत्रिक सुधारणा करणे.

– , अभिनेता

वेगळं भाडं कशाला?
अनेक नाट्यगृहांतील खटकणारी बाब म्हणजे तेथील अस्वच्छता. गेली दोन वर्षं नाट्यगृह बंद असताना आवश्यक ती कामं झाली नसल्यामुळे तेथील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. काही नाट्यगृहांत मेकअपरूममधील खुर्च्यांपासून तालमीला लागणाऱ्या पंख्यांपर्यंत सगळंच भाडं देऊन घ्यावं लागतं. नाट्यगृहाचं भाडं दिल्यानंतरही या सोयी-सुविधा मिळणार नसतील तर काय उपयोग? नाट्यगृहांच्या भाड्यात हवं तर जादा भाडं लावा, पण स्वच्छता आणि सोयी-सुविधांकडे लक्ष द्या.

खटकणारी बाब – नाट्यगृहांतील प्रसाधनगृहांची अस्वच्छता आणि छोट्या गोष्टींसाठी वेगळं भाडं देणं.

काय करायला हवं? – लहानसहान वस्तूंसाठी वेगळं भाडं द्यायला लागू नये आणि स्वच्छता

– संतोष पवार, लेखक-दिग्दर्शक-अभिनेता

तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष
गेल्या दोन वर्षांत नाट्यगृहांमध्ये काही सुधारणा झाल्या असतील असं वाटत होतं; पण परिस्थिती जैसे थे अशीच आहे. कोणत्याही नाट्यगृहात हवी तशी स्वच्छता राखली जात नाही. पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहातील प्रसाधनगृहांची अवस्था फारच दयनीय आहे. व्यवस्थापक मंडळ ‘सुधारणा केल्या’ असं म्हणत असले तरी ते दिसून मात्र येत नाही. नाट्यगृहात तज्ज्ञांकडून तांत्रिक बाबी तपासून घेणं गरजेचं आहे, याची जाणीव व्यवस्थापकांना व्हायला हवी.

खटकणारी बाब – बालगंधर्व नाट्यगृहातील प्रसाधनगृहांची दुरवस्था, सर्वच नाट्यगृहांतील अस्वच्छता.

काय करायला हवं? – सर्वच नाट्यगृहांतील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणं

– आनंद इंगळे, अभिनेता

स्वच्छता गरजेची
करोनाकाळानंतर मोजकी नाट्यगृहं वगळता अजूनही काही नाट्यगृहांत स्वच्छता राखली जात नाही. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील मेकअप रूम आणि शौचालयाची दुरवस्था बघवत नाही. मेकअप रूममध्ये खुर्ची, लाइट्स यांची सोय करून देण्यासाठी सातत्यानं सांगावं लागतं. कालिदास नाट्यमंदिरात स्वच्छता राखली जाते; पण पाण्याची सुविधा दिली जात नाही. अनेक नाट्यगृहांना कचरापेटी देण्यात आली आहे; परंतु त्याचा उपयोग सर्व ठिकाणी होताना दिसत नाही.

खटकणारी बाब – आचार्य अत्रे रंगमंदिरमधील प्रसाधनगृहांची दुरवस्था

काय करायला हवं? – नाट्यगृहाच्या व्यवस्थापनानं आणि प्रत्येक कलाकारानंही स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे

– निवेदिता सराफ, अभिनेत्री

ध्वनीव्यवस्थेच्या समस्या
आताच नाट्यगृहं सुरू झाल्यामुळे व्यवस्थापनात बऱ्याच अडचणी येत असतात. पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहातील मेकअप रूमजवळील शौचालय नेहमीच अस्वच्छ आणि नादुरुस्त असतं; ते स्वच्छ झालं पाहिजे. आपण एकूणच सार्वजनिक व्यवस्थेतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो. हा आपल्या राहणीमानाचा दोष आहे. नाट्यगृहात ध्वनी व्यवस्थेच्या समस्या आहेत; पण यात सुधारणा होईल अशी आशा आहे. वर्षानुवर्षे या समस्यांवर बोललं जातंय; पण काहीच बदल घडताना दिसत नाही.

खटकणारी बाब – पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहातील अस्वच्छता, तांत्रिक बिघाड, विविध समस्यांकडे दुर्लक्ष

काय करायला हवं? – स्वच्छता राखणे, तांत्रिक गोष्टींची वेळेवर दुरुस्ती करणे.

– वैभव मांगले, अभिनेता

संकलन : सुरज कांबळे, साक्षी जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here