अल जजिराच्या बातमीनुसार लुहानस्कच्या गव्हर्नरने रशियनं सैन्यानं शहराच्या ८० टक्के भागावर ताबा मिळवल्याची माहिती दिली. व्लादिमीर पुतीन यांना डोनबासपर्यंत रशियाची सीमा वाढवायची आहे. रशियाला डोनबासमधील सत्ता रशियासमर्थक बंडखोरांच्या हाती सोपवायची आहे. युद्ध सुरु होण्यापूर्वी देखील या भागावर रशियाच्या समर्थकांनी ताबा मिळवला होता. मात्र, २४ फेब्रुवारीला युद्ध सुरु होण्यापूर्वी डोनबास शहराचा ६० टक्के भाग यूक्रेनच्या ताब्यात होता. रशियानं यूक्रेनच्या नाटोमधील सहभागाच्या मुद्यावरुन युद्धाला सुरुवात केली होती.
गव्हर्नर सेरही हैदे यांनी रशियानं लुहानस्क शहरात हल्ले वाढवल्याची माहिती दिली आहे. रशियानं पूर्व आणि दक्षिण यूक्रेनमध्ये नव्यानं हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. हैदे यांनी रशियन सैन्य क्रेमिना शहरावर ताबा मिळवल्यानंतर ते रुबिजन आणि पोपसना शहरावर ताबा मिळवण्याच्या उद्देशानं पुढे जात आहेत, अशी माहिती दिली. हैदे यांनी नागरिकांना तात्काळ शहर सोडण्याचं आवाहन केलं आहे. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ५० लाख लोकांनी यूक्रेन सोडलं असल्याचं समोर आलं आहे.
रशियानं त्यांच्या नव्या सम्राट आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईलचं परीक्षण केलं आहे. दुसरीकडे अमेरिकेनं पाठवलेल्या शस्त्रांचा वापर कसा करायचा याचं प्रशिक्षण यूक्रेनच्या सैनिकांना देण्यात येत आहे. यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी देशात मार्शल लॉ वाढवण्याचे संकेत दिले आहेत. यूक्रेनच्या संसदेत मार्शल लॉ संदर्भातील विधेयक सादर करण्यात आलं आहे. देशात २४ जूनपर्यंत मार्शल लॉ वाढवला जाईल.