‘टीव्ही ९ मराठी’ ने पोलीस पदोन्नतीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आल्याचे वृत्त दिले आहे. त्यानुसार गृहमंत्रालयाच्या यादीत नाव असणाऱ्या पाच पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखण्यात आली आहे. हे पोलीस अधिकारी मुंबई आणि ठाण्यातील असल्याचे समजते. यासंदर्भात गृहमंत्रालय किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, यानिमित्ताने पुन्हा एकदा निर्णय घेताना सरकारी पातळीवर घातल्या जाणाऱ्या गोंधळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची खोटी यादी प्रसिद्ध होणे किंवा अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबवण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे गृहमंत्रालय आणि मुख्यमंत्री यांच्यात पुरेसा समन्वय नसल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जातो.
गृहमंत्रालयाने नेमका काय आदेश काढला होता?
राज्यातील विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक आणि अधीक्षक दर्जाच्या ३७ अधिकाऱ्यांच्या बुधवारी बढत्या आणि बदल्या करण्यात आल्या होत्या. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त म्हणून सुहास वारके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी उत्तर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांच्याकडे सोपविण्यात आली होती. पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे पुण्याचे सहआयुक्त झाले होते. तर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली करून जयंत नाईकनवरे यांना नाशिकच्या आयुक्तपदाची धुरा देण्यात आली होती.