देशाच्या राजधानीत करोना संसर्गाचा उद्रेक सुरु आहे. गेल्या २४ तासात करोनाचे १००९ रुग्ण आढळून आले आहेत. तर, एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे. मंगळवारी दिल्लीत करोनाच्या ६०१ रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत करोना रुग्ण वाढत आहेत. दिल्लीतील करोना संक्रमणाचा दर ५.७० टक्केंवर पोहोचला आहे. तर, बुधवारी ३१४ जणांनी करोनावर मात केली.
१० फेब्रुवारीनंतर दिल्लीत करोना रुग्णसंख्या १ हजारांवर गेली आहे. १० फेब्रुवारीला दिल्लीत ११०४ करोना रुग्ण आढळले होते. नवी दिल्लीत करोना रुग्णसंख्या वाढली असली तर चाचण्यांची संख्या वाढवण्यात आलेली नाही. बुधवारी १७७०१ करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ९५८१ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या होता.
नवी दिल्लीत चार दिवसात रुग्ण दुप्पट
नवी दिल्लीत गेल्या आठवड्यात करोना रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली होती. १७ एप्रिलला ५१७, १८ एप्रिल रोजी ५०१, १९ एप्रिलला ६३२ आणि बुधवारी १००९ करोना रुग्ण आढळू आले आहेत. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या माहितीनुसार दिल्लीत १० एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान करोना संक्रमणाचा दर ६ पट वाढला आहे. सोमवारी करोना संक्रमणाचा दर ७.७२ टक्केंवर पोहोचला होता. नवी दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यांमध्ये करोना रुग्णसंख्या करोना रुग्णसंख्या गेल्या आठवड्यापासून वाढत आहे. वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येमुळं उत्तरेकडली हरियाणा, पंजाब मध्ये मास्क बंधनकारक करण्यात आला आहे.