मुंबई: मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा चंग बांधलेल्या खासदार नवनीत राणा यांना मुंबईत शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) या दोघांनी आपण २३ एप्रिल रोजी मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करणार असे सांगत शिवसेनेला जाहीर आव्हान दिले होते. त्यासाठी राणा दाम्पत्य शुक्रवारी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी मुंबईत ‘फिल्डिंग’ लावायला सुरुवात केली आहे. राणा दाम्पत्य विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईत येऊ शकते, ही शक्यता गृहीत धरून शिवसैनिक शुक्रवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (CSMT) पोहोचले होते. सीएसएमटीच्या फलाट क्रमांकावर १८ वर पहाटेपासूनच शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली होती. जेणेकरून राणा दाम्पत्य ट्रेनमधून उतरल्यानंतर त्यांना लगेच विरोध करता येईल. मात्र, विदर्भ एक्स्प्रेस काहीवेळापूर्वीच मुंबईत दाखल झाली आहे. त्यामधून राणा दाम्पत्य उतरलेले नाही. त्यामुळे आता नवनीत राणा आणि रवी राणा कोणत्या मार्गाने मुंबईत दाखल होतात, हे पाहावे लागेल. (MP Navneet Rana will go on Matoshree)

तर दुसरीकडे अमरावतीमध्येही शिवसैनिकांकडून राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. सध्या राणा दाम्पत्य नेमके कुठे आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र, शिवसैनिकांनी सर्व शक्यता गृहीत धरून राणा दाम्पत्याला विरोध करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. या सगळ्यांतरही राणा दाम्पत्य ‘मातोश्री’च्या परिसरात पोहोचल्यास मुंबईत हायव्होल्टेज ड्रामा रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस काय पावले उचलणार, हे पाहावे लागेल.
Navneet Rana: शिवसैनिकांनी तारीख आणि वेळ सांगावी, मी मातोश्रीवर येऊन दाखवते; नवनीत राणांचं ओपन चँलेज

नवनीत राणांचं शिवसेनेला ओपन चँलेज

हनुमान जयंतीच्या दिवशी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी अमरावतीमध्ये हनुमान चालिसा पठण केले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेला जाहीर आव्हान दिले होते. शिवसैनिकांनी मला तारीख आणि वेळ सांगावी. मी त्यादिवशी ‘मातोश्री’वर येऊन हनुमान चालिसेचं पठण करेन, अशी शब्दांत खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेविरोधात दंड थोपटले होते. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. त्यामुळे या दोघांची ताकद माझ्या पाठिशी आहे. याशिवाय, संकटमोचक हनुमानही माझ्या पाठिशी आहे, असेही नवनीत राणा यांनी म्हटले होते.

राणा दाम्पत्य सुपारी घेऊन काम करते, शिवसेनेला आव्हान देण्याची त्यांची औकात नाही: अनिल परब
शिवसैनिकांचा नवनीत राणांना इशारा

नवनीत राणा यांनी डिवचल्यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी शिवसैनिक मातोश्रीच्या परिसरात जमले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला तुम्ही मातोश्रीवर येऊनच दाखवा. ते परत कसे जातात, हे आम्ही पाहतो, असे आव्हान दिले होते.यावेळी शिवसैनिक राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक झाले होते. त्यांच्याकडून नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here