स्वामी विवेकानंद यांनी म्हटलं होतं, ‘शिवरायांहून कुणी महान नायक, महान संत, महान भक्त आणि कुणी महान राजा झालाच नाही. आमच्या महान ग्रंथांमध्ये मनुष्यातल्या जन्मजात शासकाचे जे गुण वर्णिले आहेत, शिवाजी त्यांचे साकार रूप होते.’ या शब्दांबाबत कुणाचं दुमत नसावं. हरलेलं युद्धही कसं जिंकायचं हे एखादा व्युत्पन्न, तरआयुष्य संपल्यावरही कसं जगायचं हे एखादा स्वयंभू राजाच जाणू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज हे असेच जनतेचे राजे होते आणि आहेत. हीच साक्ष आपल्याला ‘शेर शिवराज ः स्वारी अफजलखान’ हा चित्रपट देतो.

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं ‘शिवाष्टक’ ही चित्रपट शृंखला हाती घेतली असून, ती आता ‘शेर शिवराज…’ या चित्रपटापर्यंत येऊन ठेपली आहे. या चित्रपटात महाराजांच्या युद्धनीतीचं मूर्तस्वरूप प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे. महाराजांचे विविध गुण, दूरदर्शिपणा, युद्धनैपुण्य, राजकारणातलं अष्टपैलुत्त्व आपल्याला त्यांच्या जीवनप्रवासात दिसतं. हाच प्रवास टप्याटप्यानं दिग्दर्शक मांडतो. शिवाजी महाराजांनी विदुर, कृष्ण, चाणक्य, शुक्राचार्य, हनुमान आणि राम अशा सर्वांना आत्मसात केलं होते. आई जिजाऊसाहेबांकडून रामायण आणि महाभारताची शिकवण घेतली. तिथूनच कथानकाचा प्रारंभ होतो. ‘नरसिंह आणि हिरण्यकश्यपू’ यांची गोष्ट सर्वांना ठाऊक आहे. याच कथानकाचा कुशलतेनं वापर करून चित्रपटाचं उपकथानक रचलेलं आहे. शिवकालीन इतिहास आणि पुराणकथा यांची सांगड लेखकानं चपखल बसवली आहे. किल्ले प्रतापगडाचा पायथा हा ‘स्वराज्याचा उंबरठा’ मानला गेला. स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानावर त्याच उंबरठ्यावर वाघनखं आणि बिचव्यानं हल्ला करून महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. त्यातला थरार आणि महाराजांचे ‘नरसिंह सम हा!’ म्हणावे असे रूप पडद्यावर इतिहास जिवंत करतो.

संवादलेखन आणि विविध व्यक्तिरेखांच्या तोंडी असलेल्या संदर्भांमधून (ऐतिहासिक दाखले) लेखकाची मेहनत दिसून येते. युद्धाची तयारी, आखणी आणि प्रत्यक्ष युद्ध यांचं चित्रणही परिणामकारक आहे. केवळ महाराजचं नव्हे, तर त्यांच्या साथीदारांचा पराक्रम, कूटनीती आदी पैलूही चित्रपटात ठळकपणे येतात. सरनोबत नेताजी पालकर (विक्रम गायकवाड), सुभेदार तानाजी मालुसरे (अजय पुरकर), मातोश्री दिपाऊ बांदल (दीप्ती केतकर), बहिर्जी नाईक (दिग्पाल लांजेकर), केसर (मृण्मयी देशपांडे), कृष्णाजी भास्कर (ज्ञानेश वाडेकर), गोपीनाथ बोकील (वैभव मांगले), येसाजी कंक (सुश्रुत मंकणी), सरदार कृष्णाजी बंककर (मंदार परळीकर), कान्होजीराव जेधे (समीर धर्माधिकारी), विश्वास दिघे (आस्ताद काळे), नरवीर जीवा महाले (निखिल लांजेकर), पिलाजी गोळे (अक्षय वाघमारे) आदी सर्व व्यक्तिरेखांचं कौशल्य आणि वेगळेपण पडद्यावर नीट उमटतं. वैभव मांगले यांनी महाराजांचे वकिल अर्थात गोपीनाथपंत बोकील यांची व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारली आहे. मुत्सद्दी बहिर्जी नाईकांची भूमिकास्वत: दिग्पालनं उत्तम साकारली आहे.

एका प्रसंगात जिजाऊसाहेब (मृणाल कुलकर्णी) महाराजांवर (चिन्मय मांडलेकर) चिडतात. या प्रसंगातले संवाद, दोंघांचाही अभिनय, दिग्दर्शन आणि छायांकन सगळं फारच उत्तम जमून आले आहे. मृणाल यांनी आऊसाहेबांच्या भूमिकेतली तळमळ, काळजी आणि राग कुशलतेनं व्यक्त केला आहे. अभिनेते मुकेश ऋषी यांनीही अफजलखानाची व्यक्तिरेखा प्रभावीपणे निभावली आहे. या व्यक्तिरेखेचे वजन आणि बाहुतली ताकद त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच आहे. काही प्रसंगांमध्ये ते गोंधळलेले वाटतात. चिन्मय नेहमीप्रमाणे महाराजांची भूमिका जगला आहे. पराक्रमांव्यतिरिक्त महाराजांच्या जीवनप्रवासातल्या काही हळव्या प्रसंगांनाही चित्रपट स्पर्श करतो. ते चिन्मयनं उत्तम केले आहेत.

चित्रपटाच्या ‘सीजीआय’ आणि ‘व्हीएफएक्स’मध्ये निर्मितीमूल्याचे तोकडेपण प्राकर्षानं जाणवतं. प्रतापगडाच्या बुरुजावरील प्रसंग, महादरवाजावरील प्रसंग असे खऱ्याखुऱ्या स्थळावर चित्रित करण्यात आलेले जे प्रसंग आहेत, त्यांचा दर्जा चांगला आहे. रेशमी सरकारनं छायांकन आणि विनोद राजेनं संकलनाचं काम रेखीव केलं आहे. चित्रपटातले एरियल शॉट (हवाई छायांकन) प्रथमेश अवसरेनं उत्तम टिपले आहेत. पूर्णिमा ओक यांनी केलेली वेशभूषा आणि सानिका गाडगीळ यांची रंगभूषा पटकथेला जिवंत करते. देवदत्त बाजी या संगीतकारानं चित्रपटाची उंची वाढवली आहे. एकदंरच निर्मितीमूल्यांच्या मर्यादेतही दिग्पाल आणि टीमनं उमदं काम केलं आहे.

शेर शिवराज ः स्वारी अफजलखान

निर्माते ः नितीन केणी, प्रद्योत पेंढरकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर

लेखक-दिग्दर्शक ः दिग्पाल लांजेकर

कलाकार ः चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, मुकेश ऋषी, विक्रम गायकवाड, अजय पुरकर, दीप्ती केतकर, मृण्मयी देशपांडे, वैभव मांगले, समीर धर्माधिकारी

छायांकन ः रेशमी सरकार

संकलन ः विनोद राजे

दर्जा ः साडेतीन स्टार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here