यावेळी संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. नवनीत राणा यांनी २३ एप्रिलला मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा पठणाचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. मात्र, नवनीत राणा या केवळ स्टंटबाजी करत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ती सिनेमातील लोक आहेत, त्यांना स्टंटचा अनुभव आहे. मात्र, त्यांच्या स्टंटबाजीने कोणताही फरक पडणार नाही. त्यांना अजून मुंबईचं पाणी माहिती नाही. त्यांना काय करायचे आहे ते करु द्या. राणा दाम्पत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसैनिक सक्षम असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी भाजपवरही आगपाखड केली. हनुमान चालीसा वाचणे हा श्रद्धेचा विषय आहे, नौटंकी किंवा स्टंटचा नव्हे. पण भाजपने हिंदुत्वाची नौटंकी करून ठेवली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा ही याच नौटंकीमधील पात्र आहेत. परंतु, भाजपच्या हिंदुत्वाच्या नौटंकीला जनता गांभीर्याने घेत नाही. हनुमान जयंती आणि रामनवमी हे सण आम्ही तुमच्यापेक्षा मोठ्याप्रमाणात मुंबईत साजरे करतो. त्यामुळे भाजपने आम्हाला शिकवू नये. त्यांना जे काही स्टंट असतील ते करू द्या, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
राणा दाम्पत्याविरोधात शिवसेना आक्रमक
राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी आज सकाळपासूनच शिवसैनिकांनी मुंबईत ‘फिल्डिंग’ लावायला सुरुवात केली होती. सुरुवातीला राणा दाम्पत्य विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईत येणार असल्याची चर्चा होती. त्यासाठी आज पहाटेपासूनच शिवसैनिक सीएसएमटी स्थानकावर ठाण मांडून बसले होते. मात्र, राणा दाम्पत्य या ट्रेनने आलेच नाहीत. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा मुंबईत विमानाने दाखल होणार असल्याची शक्यता आहे. मुंबईत आल्यानंतर विमानतळाशेजारीच असणाऱ्या नंदगिरी गेस्टहाऊसवर त्यांचा मुक्काम असेल. त्यासाठी राणा दाम्पत्याकडून गेस्ट हाऊसमध्ये बुकिंगही करण्यात आले आहे. ही माहिती कळाल्यानंतर शिवसेनेचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा नंदगिरी गेस्ट हाऊसकडे वळवला आहे. सध्या शिवसैनिकांनी नंदगिरी गेस्टहाऊसला घेराव घातला आहे. याठिकाणी शिवसैनिकांकडून नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.