वरिष्ठ पोलीस अधिकारी मंजुनाथ सिंगे यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना ही नोटीस दिली. या नोटीसचे उल्लंघन केल्यास राणा दाम्पत्यावर कायद्याप्रमाणे कारवाई होईल, असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. या सगळ्यानंतर आता राणा दाम्पत्य काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
नवनीत राणा मुंबईत दाखल झाल्या आहेत, हे समजल्यापासून शिवसैनिकांना मातोश्रीबाहेर गर्दी करायला सुरुवात केली. शिवसेनेचे अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांचा जमाव सध्या मातोश्रीच्या परिसरात ठाण मांडून आहे. त्यामुळे शिवसैनिकांची सुरक्षाव्यवस्था भेदून नवनीत राणा आणि रवी राणा मातोश्रीपर्यंत कसे पोहोचणार, याबाबत शंकाच आहे. त्यामुळे आता नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईत शिवसैनिकांची ‘फिल्डिंग’
नवनीत राणा आणि रवी राणा विदर्भ एक्स्प्रेसने सकाळी मुंबईत येणार असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे सीएसएमटीच्या फलाट क्रमांकावर १८ वर पहाटेपासूनच शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली होती. जेणेकरून राणा दाम्पत्य ट्रेनमधून उतरल्यानंतर त्यांना लगेच विरोध करता येईल. मात्र, या ट्रेनमध्ये नवनीत राणा नसल्याने शिवसैनिकांना माघारी परतावे लागले होते. त्यानंतर शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याचे बुकिंग असलेल्या नंदगिरी गेस्ट हाऊसलाही वेढा दिला होता. याशिवाय, राणा यांच्या खारमधील इमारतीबाहेरही शिवसैनिक जमले असून त्याठिकाणी घोषणाबाजी सुरु आहे.