वॉशिंग्टन: करोना विषाणूची साथ व लॉकडाऊनमुळं नोकऱ्या गमवाव्या लागलेल्या ‘एच १ बी’ व्हिसाधारकांना नव्या नोकरीचा शोध घेण्यासाठी वाढीव मुदत द्या. तोपर्यंत त्यांना अमेरिकेतच राहू द्या,’ अशी मागणी एका ऑनलाइन याचिकेद्वारे ट्रम्प सरकारकडं करण्यात आली आहे. या संदर्भातील याचिकेला ५० हजारांहून अधिक लोकांनी समर्थन दिल्यानं ट्रम्प प्रशासनावरील दबाव वाढला आहे.

‘एच वन बी’च्या नियमांनुसार, बिगर अमेरिकी नागरिकाच्या व्हिसाची मुदत संपण्याआधी त्याची नोकरी गेल्यास नवी नोकरी शोधण्यासाठी त्याला ६० दिवसांची मुदत दिली जाते. नव्या नोकरीची तजवीज न झाल्यास अशा व्यक्तीला देश सोडावा लागतो. मात्र, सध्या अमेरिकेसह जगभर करोनाचं संकट घोंगावतं आहे. अनेकांच्या रोजगारावर अचानक कुऱ्हाड कोसळली आहे. अशा संकटाच्या काळात नवा रोजगार मिळवण्यासाठी बिगर अमेरिकी नागरिकांना वाढीव मुदत द्यावी. आताचा ६० दिवसांचा कालावधी १८० दिवसांपर्यंत वाढवावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

‘सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा सर्वात मोठा फटका ‘एच वन बी’ व्हिसा धारकांना बसला आहे. यामध्ये सर्वाधिक भारतीय नागरिक आहेत. करोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतासह सर्वच देशांनी प्रवेश बंदी केल्यानं हे लोक आपल्या कुटुंबासह अमेरिका सोडू शकत नाहीत, असंही याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

ए. एन. अशा संक्षिप्त नावानं १९ मार्च रोजी ही ऑनलाइन याचिका अपलोड करण्यात आली आहे. व्हाइट हाउसच्या नियमानुसार, ‘कोणत्याही ऑनलाइन याचिकेला ३० दिवसांत किमान १ लाख लोकांनी समर्थन दिल्यास ती पुढील कार्यवाहीसाठी ग्राह्य धरली जाते. त्यामुळं ‘एच १ बी’ धारकांच्या या याचिकेवर १८ एप्रिलपर्यंत १ लाख लोकांच्या स्वाक्षऱ्या होणं आवश्यक आहे.

अमेरिकी नागरिकत्व व स्थलांतरण कायद्यानुसार, ‘त्या-त्या वेळच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन विशेष बाब म्हणून व्हिसाची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, अमेरिकेतील लॉकडाऊननंतर नोकऱ्या गमावलेल्या लोकांबद्दल असा विचार सुरू आहे का, याबद्दल काहीही बोलणं प्रशासनानं टाळलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here