‘माझं आताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. आम्ही राष्ट्रपती राजवट, ईडी आणि सीबीआय या सगळ्याच्या पलीकडे गेलो आहोत. सत्तेची पर्वा आम्हाला नाही. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं एक अजरामर वाक्य आहे, आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली आहे. सत्ता ही फक्त खुर्चीची नसते, शिवसेना हीच एक सत्ता आहे आणि या सत्तेचे चटके आतापर्यंत अनेकांनी घेतले आहेत, तुम्हालाही घ्यायचा असेल तर घ्या,’ असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
‘शिवसैनिक नेहमीच मरायला आणि मारायला तयार असतात’
राणा दाम्पत्याच्या भूमिकेला भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘राष्ट्रपती राजवट लावण्यात येईल, अशा धमक्या आम्हाला देऊ नका. तुम्ही सीबीआय लावा, ईडी लावा, मात्र तरीही आम्ही तुम्हाला घाबरत नाही. सध्या शिवसैनिकांवर कोणाचंही नियंत्रण नाही. गेल्या दोन दिवसांतील घटनांमुळे फक्त शिवसैनिकच नाही तर जनतेच्याही संतापाचा उद्रेक झाला आहे. केंद्रीय पोलीस दलाचा वापर करून तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला आमच्या संरक्षणासाठी पोलिसांची गरज नाही, शिवसैनिक पुरेसे आहेत. शिवसैनिक नेहमीच मरायला आणि मारायला तयार असतात,’ असं राऊत म्हणाले.
दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मोठं करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, मात्र यामध्ये त्यांचेच हात जळतील, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.