केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे काल जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर होते. त्यांच्या हस्ते जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमात व्यासपीठावर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील व भाजपचे खासदार उन्मेश पाटील एकमेकांच्या शेजारी बसल्याचे चित्र दिसून आले. यावेळी दोघांनी एकमेकांशी संवाद साधला.
सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी माझ्यामुळे उन्मेश पाटील खासदार झाला, अशी टीका केली होती. पाटील यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी गुलाबराव पाटील यांना राज्याच्या समस्या कळत नाही. भारनियमनाचा महत्त्वाचा प्रश्न सोडून ते माझ्यावर टीका करत आहेत. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते कॅबिनेटमध्ये जातात की केवळ हप्ते आणि भत्ते घेण्यासाठी मंत्री पाटील जातात का, असा सवाल देखील उपस्थित केला होता.
गुलाबराव पाटील व उन्मेश पाटील यांच्या दोघांमधील शाब्दिक संघर्षामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. असे असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील व खासदार उन्मेश पाटील हे चक्क एकमेकांच्या शेजारी खुर्चीला खुर्ची लावून बसले असल्याचे चित्र दिसून आले. गडकरींच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोघांनी नेत्यांमधील राजकीय वैर संपले की काय अशीही चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये रंगली होती.