म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :

दिल्लीत गेल्या वर्षी १९ डिसेंबरला झालेल्या धर्मसंसदेत कोणत्याही समुदायाविरुद्ध विखारी भाषण देण्यात आले नव्हते, असा प्रतिज्ञापत्रातून दावा करणाऱ्या दिल्ली पोलिसांवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तीव्र रोष व्यक्त केला. तसेच त्यांना सुधारित प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. (Delhi Police News)

दिल्लीच्या गोविंदपुरीमध्ये झालेल्या हिंदू युवा वाहिनीच्या धर्मसंसदेत सुदर्शन न्यूजचे सुरेश चव्हाणके यांनी ‘हिंदू राष्ट्रासाठी लढू, मरू आणि गरज भासल्यास मारू’ अशी उपस्थितांना शपथ घेण्याचा आग्रह केल्याचा आरोप आहे. चव्हाणके यांच्या भाषणासंबंधात व्हिडिओ आणि अन्य साहित्याची गहन चौकशी केली असताना त्यांनी कोणत्याही समुदायाविरुद्ध विखारी भाषण दिले नसल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. हा केवळ चौकशी अधिकाऱ्याचा अहवाल आहे की, पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांचीही हीच भूमिका आहे, असा सवाल करत न्यायालयाने त्यांना चांगलंच फटकारले. या संबंधात ४ मेपर्यंत नवे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्या. अभय ओक यांनी दिले. याप्रकरणी ९ मे रोजी सुनावणी होणार आहे.

Bihar Politics: नितीश यांनी भाजपचं टेन्शन वाढवलं!; तेजस्वी यांच्या इफ्तार पार्टीत असं काय घडलं?

हरिद्वार आणि दिल्लीत झालेल्या हिंदू युवा वाहिनीच्या बैठकींमध्ये चिथावणीखोर भाषणे करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या पत्रकार कुर्बान अली आणि ज्येष्ठ वकील अंजना प्रकाश यांच्या याचिकेवर दिल्ली पोलिसांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्राला वरिष्ठांनी दुजोरा दिला आहे काय, असा सवाल न्या. खानविलकर यांनी केला. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येईल, असे दिल्ली पोलिसांच्या वतीने युक्तिवाद करणारे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल नटराज म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here