राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाण्याचा चंगच बांधल्याने पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाण्याचा आपला हट्ट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईत येत आहेत. त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आपण माघार घेत असल्याचे रवी राणा यांनी स्पष्ट केले.
‘राणा दाम्पत्याने घरी बसून हनुमान चालिसा वाचावी’
राणा दाम्पत्याकडून जे काही सुरु केले आहे, ते अनावश्यक आहे. हनुमान चालीसा वाचायची असेल तर त्यांनी ती अमरावती किंवा मुंबईतील घरी बसून वाचावी. त्यासाठी अमुक ठिकाणी जाण्याचा हट्ट का धरला जात आहे? करोना काळातही मंदिरे बंद असल्यावरून भाजपकडून आंदोलने करण्यात आली. या सगळ्याच्या माध्यमातून विरोधी पक्षाला असे दाखवायचे आहे की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित नाही, असा आरोप दिलीप वळसे-पाटील यांनी केला.