राणा दाम्पत्याने मागील दोन दिवसांपासून हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचल्याने मुंबईत मोठं नाट्य घडलं. आम्ही मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर जाऊन हनुमान चालिसाचं पठण करू, अशी घोषणा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केली होती. या घोषणेनंतर मुंबईतील शिवसैनिकही आक्रमक झाले आणि राणा दाम्पत्य वास्तव्यास असलेल्या खार येथील घराला घेराव घातला. या सर्व घडामोडींमुळे मुंबईत काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे राणा पती-पत्नी नक्की काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी मुंबईत दाखल होत असल्याने त्यांच्या दौऱ्यात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही आमचं आंदोलन मागे घेत असल्याचं रवी राणा यांनी जाहीर केलं. राणा दाम्पत्याच्या या भूमिकेनंतर संजय राऊत यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला.
‘आम्ही पुन्हा सत्तेत येणार’
महाराष्ट्रात गोंधळ घालून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न काही घटकांकडून करण्यात येत आहे. मात्र हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे आणि पुन्हा आम्हीच सत्तेत येऊ, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
‘तुम्ही पळपुटे आहात, प्रत्येकवेळी तुम्हाला पळून जावं लागेल. मात्र गोंधळ घालणाऱ्या लोकांचे मी आभार मानतो. कारण काहीजण शिवसेना कुठे आहे? असा प्रश्न विचारत होते. त्यांना गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना मुंबईतही दिसत आहे आणि महाराष्ट्रातही दिसत आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं तेज अजूनही शिवसैनिकांच्या मनगटात आहे,’ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.