‘मातोश्री’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचं पठण करण्याची घोषणा करणाऱ्या राणा दाम्पत्याने माफी मागावी, अशी मागणी करत शिवसैनिकांनी नवनीत राणा आणि रवी राणा वास्तव्यास असणाऱ्या खार येथील घराबाहेर प्रचंड गर्दी केली आहे. आक्रमक झालेले शिवसैनिक राणा पती-पत्नीविरोधात जोरदार घोषणाबाजीही करत आहेत. तसंच राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांची माफी मागितल्याशिवाय त्यांना घराबाहेर पडू देणार नाही, असा पवित्रा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेला आव्हान देण्यासाठी आता भाजपकडून नारायण राणे हे मैदानात उतरले आहेत.
‘राणा पती-पत्नीच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल. राज्यातील सरकारच वातावरण बिघडवत आहे. संजय राऊत आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांना मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा आहे, याची माहिती आहे की नाही? सत्ताधारी नेतेच धमक्या देऊ लागल्याने राज्यात पोलीस यंत्रणा आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. ‘मातोश्री’वर फक्त २३५ शिवसैनिक जमले होते आणि राणा यांच्या घरासमोर १२५ शिवसैनिक आले,’ असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.
दरम्यान, शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य या वादात नारायण राणे यांनी आक्रमकपणे उडी घेतल्याने राजकीय संघर्ष आणखी टोकदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.