पिंपरी : ‘महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गाजावाजा करीत अर्धवट अवस्थेतील मेट्रोचे उद्घाटन करून भारतीय जनता पक्ष तोंडघशी पडला आहे. अवघ्या महिन्याभरात मेट्रोची प्रवासी संख्या ९० टक्क्यांनी घटल्यामुळे मेट्रो तोट्यात जाऊ लागली आहे. या अपयशाची जबाबदारी भाजपचे नेते घेतील का,’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे.

‘पिंपरीसह अनेक मेट्रो स्टेशन्सची कामे अर्धवट असताना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रेय लाटण्याच्या गडबडीत सर्वसामान्यांच्या त्रासात भर घालण्याचे काम भाजपने केले आहे,’ असा आरोप करून गव्हाणे म्हणाले, ‘मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारची ५० टक्क्यांची भागीदारी आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोसाठी पाच हजार कोटींहून अधिक निधी जानेवारी २०२० मध्ये दिला. त्यानंतर कामाला गती मिळाली. राज्य सरकारने व विशेषत: पवार यांनी अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. मात्र, त्याचा ‘इव्हेंट’ कधीच केला नाही.’

‘मेट्रोची सर्व कामे पूर्ण होऊन प्रकल्प लवकर कार्यान्वित व्हावा, या हेतूने महाविकास आघाडी सरकारकडून सर्वप्रकारची मदत करण्यात आली आहे. मेट्रो प्रवाशांच्या सुविधेसाठी आहे. लोकांचा वेळ आणि पैसा वाचावा; तसेच त्यांचा प्रवास सुखकर आणि वेगवान व्हावा यासाठी हा प्रकल्प असताना केवळ महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्रात सरकार असल्याच्या बळावर भाजपच्या नेत्यांनी कामे अर्धवट असतानाही मेट्रोच्या उद्घाटनाची घाई केली,’ असेही गव्हाणे म्हणाले.

भाजपची ३ बुजगावणी म्हणत सदावर्ते, राज ठाकरे आणि राणा दाम्पत्यावर जयंत पाटलांचा हल्लाबोल
प्रवासी संख्या महिन्यात पाच हजारांवर

केवळ दिखाव्यासाठी आणि फुकटच्या स्टंटबाजीसाठी गल्ली ते दिल्ली इव्हेंटमध्ये व्यग्र असणाऱ्या भाजप नेत्यांना सर्वसामान्य लोकांच्या त्रासाशी काहीही देणे-घेणे नसल्याचेच पुणे व पिंपरी-चिंचवडच्या अर्धवट मेट्रो सेवेवरून लक्षात येते. १३ मार्चला ६७ हजारांपर्यंत गेलेला प्रवाशांचा आकडा एक महिन्यानंतर अवघा पाच हजारांवर आला आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास मेट्रो सेवा तात्पुरती बंद करावी लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पाच हजार प्रवाशांमधील पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांची संख्या केवळ एक हजार ४१७ आहे. महिन्यातील मेट्रोचे उत्पन्न ८० लाख रुपयांचे आहे, याकडेही गव्हाणे यांनी लक्ष वेधले.

श्रेयवादासाठी सुरू केलेल्या अर्धवट मेट्रोबाबत सर्वसामान्य लोकांचे आकर्षण संपले आहे. कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल सुरू आहेत. न केलेल्या कामांचे श्रेय घेण्यात तरबेज असणाऱ्या भाजपच्या ‘इव्हेंट बहाद्दर’ नेत्यांनी अर्धवट मेट्रो सुरू करून सामान्य लोकांच्या डोक्यावर बोजा घालण्याचेच काम केले आहे.

Yogesh Gharad अमरावती: शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर गोळीबार; वरुड शहरात थरार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here