शिवसैनिकांच्या कडव्या विरोधामुळे शनिवारी नवनीत राणा आणि रवी राणा यांची मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याची इच्छा पूर्ण झाली नव्हती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या दोघांना अटक केली होती. राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेलेल्या किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. सोमय्या यांची गाडी खार पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असताना शिवसैनिकांनी गाडीवर दगड भिरकावला होता. त्यामध्ये गाडीची काच फुटून किरीट सोमय्या यांना किरकोळ जखम झाली होती. त्यामुळे आज दिवसभर शिवसेना विरुद्ध आणि भाजप असा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
नादाला लागाल तर २० फूट खाली गाडू : संजय राऊत
संजय राऊत हे शनिवारी नागपूरमध्ये होते. काल रात्री ते मुंबईत परतले. नागपूरातील पत्रकार परिषदेतही संजय राऊत यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर आगपाखड केली होती. आम्ही शिवसैनिक जन्मत: माजोरडे आहोत, आमच्या नादाला लागले तर २० फूट खाली गाडू. जर तुमची आमच्या नादाला लागण्याची इच्छाच असेल तर मग तुमच्या गोवऱ्या अगोदर स्मशानात नेऊन ठेवा आणि मग मैदानात या, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.