आयएएनस घोटाळ्याचा गुन्हेगार आहे त्याचं युवक प्रतिष्ठान आहे, त्याच्या खात्याची चौकशी धर्मादाय आयुक्तांनी केली पाहिजे. ईडीनं ज्यांच्या विरोधात कारवाई सुरु केली आहे त्यांच्या प्रतिष्ठानला देणगी देण्यात आली आहे. मी अशी दहा नावे सांगेन ज्यांनी युवक प्रतिष्ठानला देणगी दिली आहे, असं संजय राऊत म्हणाले. युवक प्रतिष्ठानच्या देणगीदारांची यादी मी लवकरच जाहीर करणार आहे. ते कागद विचारतील, तुमचे कागद तुम्हीच पाहा. धर्मादाय आयुक्तांना जे कागद दिलेत ते पाहा, असं देखील संजय राऊत म्हणाले.
केंद्र सरकार ज्या लोकांना सुरक्षा देत आहे तो सिक्युरिटी घोटाळा सुरु आहे. हायकोर्टात दिलासा घोटाळा सुरु आहे, तसा केंद्रात सुरक्षा घोटाळा सुरु आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्रात सरकारविरोधात जो बोलेल त्यांना सुरक्षा देण्यात येत आहे हा घोटाळा आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
पोलीस एका पक्षासाठी काम करतात म्हणता तर केंद्रीय तपास यंत्रणा कुणासाठी काम करत आहेत. तपास यंत्रणा, न्यायालयं कुणाच्या इशाऱ्यावर काम करत आहोत. सर्वोच न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या एका बातमीचा संदर्भ देखील संजय राऊत यांनी दिला. न्यायालयाचा विश्वास आपण गमावत चाललो आहोत, हे देशासमोरील आव्हान आहे, हे सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायधीश बोलत असतील तर वकील असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ते समजून घेतलं पाहिजे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना त्याचं गांभीर्य नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटयाला पाहिजे ही पंरपरा राहिलेली आहे. मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यांचं ऐकून घेतात, त्यानंतर राष्ट्रपतींकडे जावं, संयुक्त राष्ट्रात जावं, सुरक्षा परिषदेत जावं. महाराष्ट्रातील लोकशाही, कायदा आणि सुव्यवस्था, महाराष्ट्रातील शांतता धोक्यात कुणी आणली असेल तर अपरिपक्व विरोधी पक्ष, विरोधी पक्षनेते जबाबदार आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.