भाजपला महाराष्ट्रात कोणत्याहीप्रकारे संघर्ष निर्माण करून दंगलसदृश परिस्थिती निर्माण करायची आहे. मग राज्यपाल त्यांचेच आहेत. त्यांच्यामार्फत शिफारस करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. राणा दाम्पत्यावर पोलिसांनी लावलेली कलमं योग्य आहेत, असे माझे मत आहे. सदावर्ते प्रकरणातही हेच झाले. त्यावेळी शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला. आता मातोश्रीवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. या सगळ्यामागे मोठे कारस्थान, षडयंत्र आहे. धर्माच्या नावाखाली राज्य उलथवण्याचा प्रयत्न झाल्यास राजद्रोहाचा खटला दाखल व्हायला हवा. भीमा-कोरेगाव प्रकरणातही भाजपने अनेक कवी आणि लेखकांविरोधात राजद्रोहाचे कलम वापरले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आता आम्हाला शहाणपण शिकवू नये, असे संजय राऊत यांनी म्हटले.
राणा दाम्पत्य म्हणजे काय टॉलस्टॉय आणि त्याची बायको नव्हेत. आता ते तुरुंगात बसून हनुमान चालीसा वाचू शकतात. राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा वाचण्याची इतकी हौस होती तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरी जावे, कोर्टात जावे किंवा एखादे सभागृह घेऊन हनुमान चालिसा वाचावी. महाराष्ट्रात हनुमान चालीसा वाचायला बंदी नाही. पण मातोश्रीत घुसून हनुमान चालीसा वाटण्याचा हक्क योग्य नाही. तुम्ही मातोश्रीत घुसलात तर आम्हीदेखील घुसू. राणा दाम्पत्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून बार उडवला जात आहे. पण एकही गोळी निशाण्यावर लागत नाही. भाजपचा प्रत्येक कट आम्ही अशाप्रकारे उधळून लावू, असे सोमय्या यांनी सांगितले.
मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठणावर खासदार नवनीत राणा ठाम