रशियानं यूक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यानंतर पाश्चिमात्य देशांकडून त्याचा निषेध करण्यात आला आहे. पाश्चिमात्य देशांनी यूक्रेनला रशिया विरोधात मदत केली आहे. अमेरिका, यूरोपियन यूनियन आणि इतर यूरोपियन देशांनी यूक्रेनसाठी मदत म्हणून लष्करी साहित्य देखील दिलं आहे. या दरम्यान रशियातील माध्यमांनी ब्रिटनच्या ब्रिटीश स्पेशल फोर्सच्या तुकड्या यूक्रेनमध्ये असल्याचा दावा केला आहे. रशियाकडून यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तर, रशियन माध्यमांच्या या दाव्यामुळ खळबळ उडाली आहे.
रशियातील आरआयए नोवोस्ती या वृत्तसंस्थेनं रशियन सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांच्या हवाल्यानं ब्रिटनच्या स्पेशल एअर सर्विसच्या इलाईट मिलिट्री फोर्सची तुकडी यूक्रेनमध्ये असल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ब्रिटनच्या एसएएस तुकडीला दहशतवादविरोधी प्रशिक्षण देण्यात आलेलं असते. एक तुकडी यूक्रेनच्या लवीवमध्ये असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर रशियात खळबळ उडाली आहे. यानंतर एका समितीकडे यासंदर्भातील चौकशी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार ब्रिटीश संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं याविषयी माहिती दिली आहे. आम्ही विशेष दलासंदर्भात माहिती देत नाही. यूक्रेनच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी आमची एक तुकडी यूक्रेनला गेली होती. मात्र, १७ फेब्रुवारीपूर्वी यूक्रेनमधील दुतावासाच्या संरक्षणासाठी तैनात असलेले सैनिक सोडून इतरांना माघारी बोलावण्यात आलं होतं, असं प्रवक्त्यांनी म्हटलं.
रशियानं पाश्चिमात्य देशांना यूक्रेनमध्ये युद्धसरावाचं कारण देत न येण्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळं रशिया नाटोच्या सैन्याच्या यूक्रेनमधील उपस्थितीसंदर्भात चौकशी केली जाऊ शकते. दरम्यान, रशियानं मारियुपोल शहर हल्ले करुन बेचिराख केलं आहे. मारियुपोलवर रशियाच्या सैन्यानं ताबा मिळवला आहे. रशियानं मारियुपोलमधील अझावोत्सल कंपनीवर हल्ला केला आहे. रशियाला मारियुपोलमधील स्टील कंपनीत यूक्रेनचं सैन्य लपल्याचा रशियाला संशय होता.