संपूर्ण ठाकरे कुटुंब ‘फायर आजीं’च्या भेटीला; आशीर्वाद घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले… – chief minister uddhav thackeray and his family met the 80-year-old shiv sena party worker who challenged navneet rana and ravi rana
मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी ‘मातोश्री’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. या शिवसैनिकांमध्ये ‘झुकेगा नहीं’ असं म्हणत राणा दाम्पत्याला आव्हान देणाऱ्या एका ८० वर्षांच्या आजींनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. ‘मातोश्री’साठी रस्त्यावर उतरलेल्या या आजींची भेट घेण्यासाठी त्यांच्या परळ येथील घरी उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंब दाखल झाले. यावेळी आजींचे आशीर्वाद घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे निष्ठावान शिवसैनिक हीच शिवसेनेची खरी ताकद असल्याचं म्हटलं आहे. ‘व्यक्ती वयाने मोठी होत असते, पण ती मनाने तरूण असली पाहिजे, असं शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणायचे. तशाच या नात्याने आमच्या आजी असल्या तरी अजूनही मनाने त्या युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. मी शब्दात या भावना व्यक्त करू शकत नाही, मात्र असे शिवसैनिक म्हणजे बाळासाहेबांनी मला दिलेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे,’ असं उद्धव ठाकरे यांनी या आजींच्या भेटीनंतर म्हटलं आहे. तसंच या शिवसैनिकांसमोर नतमस्तक होणं माझं कर्तव्य आहे. भर उन्हातही काल या आजी ‘झुकेगा नहीं’ असं म्हणत होत्या. बाळासाहेबांनी तयार केलेले शिवसैनिक झुकणारे नाहीत, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना थेट अंगावर घेणाऱ्या शिवसैनिकांसोबत पक्ष उभा असल्याचा संदेश उद्धव ठाकरे यांनी या भेटीच्या माध्यमातून दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.