मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्यावर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यामुळे अटकेत असणाऱ्या राणा दाम्पत्याला आज रविवारी सकाळी हजर करण्यात आले. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी अटकेची कारणे सांगतानाच सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्याचबरोबर सरकारविरोधात कट कारस्थान रचल्याचा आरोपाखाली गुन्ह्यात १२४ (अ) हे कलम वाढवल्याची माहिती घरत यांनी दिली. तर राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी या मागणीला विरोध करत अटकच बेकायदा असल्याचे सांगितले. राजकीय हेतूने ही कारवाई केली असल्याचा आरोपही राणा यांच्या वतीने मर्चंट यांनी केला.
दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडीचे आदेश येताच राणा यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला. मात्र या अर्जावर तत्काळ सुनावणी करण्यास नकार देत न्यायालयाने २९ एप्रिलला या अर्जावर सुनावणी ठेवली. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असल्याने नवनीत आणि रवी राणा यांना तुरुंगात राहावे लागणार आहे.
दरम्यान, सरकारविरोधात आक्षेपार्ह विधान करणे, मुख्यमंत्री आणि सरकारी यंत्रणेला वारंवार आव्हान देणे, यामुळे राणा दाम्पत्याविरुद्ध १२४ (अ) कलम लावण्यात आलं आहे. दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून त्यावर २९ एप्रिलला जामिनावर सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी २७ एप्रिलला न्यायालयाने लेखी युक्तिवाद करण्यास सांगितलं आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे.