नागपूर: कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्याच्या बडतर्फीचे अधिकार राज्य सरकारला नाही. हे अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे राज्याच्या गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या बडतर्फीची कारवाई भाजपने केंद्रामार्फत करावी, असं सांगत गृहमंत्री यांनी गुप्ता यांच्यावरील कारवाईचा चेंडू भाजपच्या कोर्टात टाकला आहे. तसेच भाजप नेते हे उपद्रवी व्यक्ती असल्याची टीकाही त्यांनी केली.

दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संस्थापक वाधवान बंधूंना खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर भाजपने राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तर या प्रकरणात पवार कुटुंबीयांचा हात असल्याचं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुप्ता यांचा बोलविता धनी कोण? असा सवाल करत या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडण्याचं आवाहन केलं आहे. भाजपकडून गुप्ता यांना बडतर्फ करण्याची मागणी होत असतानाच अनिल देशमुख यांनी या सर्व प्रकरणावर तपशीलवार माहिती दिली आहे.

वाधवान प्रकरणात अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे. गुप्ता यांची अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक हे चौकशी करणार आहेत. वाधवान यांच्यावर भादंविच्या कलम १८८, २६९, २७० आणि ३४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याशिवाय आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याच्या सेक्शन ५१ बी आणि कोविड१९ अॅक्टच्या सेक्शन ११ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली.

भाजप नेते किरीट सोमय्या हे उपद्रवी प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत. कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्याला बडतर्फ करायचे असेल तर त्याचे अधिकार हे केंद्राला आहेत. एवढी साधी गोष्टही सोमय्या यांना माहीत नाही. सोमय्या आणि भाजपने केंद्राच्या माध्यमातून गुप्ता यांना बडतर्फ करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोलाही देशमुख यांनी लगावला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here