राज्यातील घडामोडींबाबत देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये काल (रविवारी) चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांना हाताशी धरून राज्य सरकार भाजप नेत्यांवर हल्ले करत असल्याचं यावेळी फडणवीस यांच्याकडून गृहमंत्र्यांना सांगण्यात आल्याचं समजते. या संभाषणाचा सविस्तर तपशील अद्याप बाहेर आलेला नाही. मात्र किरीट सोमय्या यांनीही दिल्लीत पत्रकारांशी बोलताना या दोन नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे.
एकीकडे, फडणवीस-शहा यांच्यामध्ये खलबतं झालेली असतानाच आज किरीट सोमय्या यांच्यासह राज्यातील भाजपचे विविध नेते दिल्लीत दाखल झाल्याने केंद्रीय पातळीवरून महाराष्ट्रातील घटनांबाबत हस्तक्षेप केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं झाल्यास पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध मोदी सरकार असा संघर्ष रंगणार आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे.