सूत्रांच्या माहितीनुसार, किरीट सोमय्या यांना झालेली जखम ही कृत्रिम असल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी खार पोलीस ठाण्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत पोलीस दल किंवा गृहखात्याकडून अधिकृतपणे कोणतीही वाच्यता करण्यात आलेली नाही. किरीट सोमय्या खार पोलीस ठाण्यातून निघत असताना शिवसैनिकांच्या जमावातून एक दगड गाडीवर भिरकावण्यात आला होता. यामध्ये सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली होती. मात्र, सोमय्या यांच्या हनुवटीला झालेली जखम ही त्यामुळे झाली नसावी, अशी शक्यता शिवसैनिकांकडून बोलून दाखवली जात आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पुढे काय घडणार, हे पाहावे लागेल.
किरीट सोमय्यांनी घेतली केंद्रीय गृहसचिवांची भेट
किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत गेले होते. यावेळी सोमय्या यांनी केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांची भेट घेऊन त्यांच्यावरील हल्ल्याबाबत माहिती दिली. यावेळी किरीट सोमय्या यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. माझ्यावर एकदा नव्हे तर तीनवेळा पोलिसांच्या मदतीने हल्ला करण्यात आला, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले.