murder: सातारा हादरलं! जन्मदात्या आईनेच घेतला बाळाचा जीव; फोन करून स्वत:ने दिली पोलिसांना कबूली – in satara lonand the birth mother took the life of the baby
सातारा: जिल्ह्यातील लोणंद येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. फलटण तालुक्यातील तरडगाव येथे एका जन्मदात्या आईनेच आपल्या ५ महिन्याच्या चिमुकल्या मुलाची ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक तोंड दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत लोणंद पोलिसांनी अधिक माहिती दिली की, तरडगाव येथील सौ.आरती सोमनाथ गायकवाड या महिलेने स्वत:ने लोणंद पोलीस स्टेशनला फोन करुन आपण आपल्या ५ महिन्याच्या लहान बाळाची १२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता हत्या करुन पुरले असल्याची माहिती दिली. तुम्ही लगेच गाडी पाठवा नाहीतर मी आणखी दुसऱ्या कोणाचा तरी हत्या करेल, असे या महिलेने पोलीसांना सांगितले होते. यावर पोलीसांनी तातडीने घटणास्थळी धाव घेत खात्री केली असता तिने तिचा लहान मुलगा कार्तिक सोमनाथ गायकवाड वय याची हत्या केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर या महिलेस ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयाच्या वतीने ४ दिवसांची पोलीस कोठडी…
या महिला संशयित आरोपीला फलटण न्यायालयापुढे हजर केले असता ४ दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाच्या वतीने देण्यात आली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व सहकाऱ्यांनी सरकारी पंचासमवेत घटनास्थळाचा पंचनामा करून ज्या ठिकाणी चिमुकल्याचा मृतदेह पुरला होता. त्या ठिकाणी खोदकाम करुन मृतदेह ताब्यात घेतला आहे.
त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले तेथे वैद्यकिय अधिकारी यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. या घटनेचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करीत आहेत. मात्र, आईनेच असं टोकाचं पाऊल घेत पोटच्या मुलाची हत्या का केली याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकारावर जिल्ह्यात हळहळ देखील व्यक्त होत आहे.