मुंबई : राज्यातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला जाणं भाजपच्या नेत्यांनी टाळलं आहे. याबाबत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ‘गृहमंत्री वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. मात्र या गृहमंत्र्यांना काही अधिकार तरी आहेत का? मुंबईत जे काही चाललंय ते सगळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावर चाललं आहे. गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्रीच उपस्थित राहिले नाहीत. मग ही बैठक टाइमपाससाठी होती का?’ असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. (Devendra Fadanvis On Cm Uddhav Thackeray)

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गोंधळावरून थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले की, ‘राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं, मात्र राज्यात गेल्या चार-पाच दिवसांमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या पाहून या सरकारने संवादाला काही जागा ठेवली आहे असं आम्हाला वाटत नाही. कोणी जर हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं ठरवलं असेल तर त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेलाच बरा, अशी आमची मानसिकता झाल्याने आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पोलीस संरक्षणात आमच्या नेत्यांवर हल्ले करत असतील आणि त्यानंतरही एफआयआर दाखल करण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत असेल तर अशा बैठकींना जाऊन फायदा काय?’ असं म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

महाराष्ट्रातील नाट्यानंतर दिल्लीत वेगवान घडामोडी; सोमय्या केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीला

‘मात्र आम्ही थांबणार नाही’

‘महाराष्ट्रात अशा प्रकारची स्थिती आम्ही कधीच पाहिली नाही. आम्ही पोलखोल यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेतील सगळा भ्रष्टाचार आम्ही लोकांसमोर मांडला. लोकशाहीमध्ये यापेक्षा वेगळं काय करायचं असतं? त्यांनी आमच्या पोलखोल यात्रेवर आणि रथावर हल्ला केला. सत्ताधाऱ्यांना असं वाटत आहे की असे हल्ले करून आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारावर बोलायचं थांबू, मात्र आम्ही थांबणार नाही,’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला आव्हान दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here