सोमवारी बीजिंगमध्ये ७० करोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ४६ रुग्ण हे चाओयांग शहरातील आहेत. बीजिंगची लोकसंख्या २.२ कोटी आहे. त्यापैकी ३५ लाख लोक चाओयांगमध्ये वास्तव्यास आहेत. करोना रुग्ण कमी असून देखील प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्यात येत आहेत. नागरिकांना शांघायप्रमाणं लॉकडाऊन लावलं जाण्याची भीती वाटू लागली आहे. शांघायमध्ये गेल्या ४ आठवड्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
बीजिंगमधील चाओयांग हे व्यापारी शहर आहे. तिथे मोठ्या इमारती आणि मॉल्स यासह काही देशांची उच्चायुक्त कार्यालय आहेत. बीजिंगमधील १६ जिल्ह्यांपैकी ८ जिल्ह्यात करोना रुग्ण आढळले आहेत. शांघायच्या तुलनेत बीजिंगमध्ये करोना रुग्णसंख्या कमी असले तरी प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे.
स्थानिक माध्यमांच्या बातम्यांनुसार बीजिंगमधील अनेक बाजारपेठांमधील गर्दी कमी झालेली आहे. हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला आहे. खाद्यपदार्थ घरपोहोच करणाऱ्या कंपन्यांकडून देखील त्यांच्या सेवांवर परिणाम झाल्याचं सांगण्यात आलं आहे. शांघायप्रमाणं लॉकडाऊन लागण्याची भीती असल्यानं सोशल मीडियावरुन लोकांकडून अन्नधान्य पदार्थ मोठ्या प्रमाणात खरेदी करुन ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. चीनमध्ये शून्य करोना धोरणांतर्गत कडक नियम लागू करण्यात आले आहेत. शांघायमध्ये करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी गेल्या चार आठवड्यांपासून कडक लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. नागरिकांना करोना संसर्गाऐवजी लॉकडाऊनमुळं खाद्यपदार्थाच्या संकटाला सामोरं जाव लागतं आहे. नागरिकांनी भूकबळी जाण्याऐवजी लॉकडाऊनचे नियम मो़डण्यास सुरुवात केली होती.