अकोला जिल्ह्यातील आपातापा गावातील सिमाताईचे पती बाबूलाल घोडे यांचे आठ महिन्यांपूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आता पत्नीसह ३ छोटी-छोटी मुलं आहेत. मात्र, घरी शेती नाही. अशात मुलांचा सांभाळ कसा करावा? हा प्रश्न सिमाताई समोर उभा राहिला. दुसरीकडे या कुटुंबाला तट्टयाच्या घराचा आसरा, घरावर येणार संकट म्हणजेच ‘ऊन-वारा-पाऊस’ यापासून मुलांचा सांभाळ करणेही तितकंच महत्वाचे होते. म्हणून सिमाताईने घरकुलसाठी अर्ज केला आणि घरकुल मंजूर झाले. मात्र, घरकुल संदर्भात पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश धडकले. आता घर होईल की नाही शंका निर्माण होवू लागली.
ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्या पुढाकाराने घराचे भूमिपूजन
कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले. आर्थिक आधार नसलेल्या कुटुंबांना आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्या पुढाकाराने घराचे भूमिपूजन करून कामास सुरवात केली आहे. आता पाहता पाहता अनेक लोक मदतीसाठी पुढे आले आहेत. परिस्थिती नुसार साहित्याची मदत केली जात आहे. काही दिवसातच सीमाताईचं घर उभं राहणार तिला आणि तिच्या मुलांना निवारा मिळणार.
शासकीय कर्मचारी, पदाधिकारी यांच्या पुढाकाराने या निराधार कुटुंबाला शासनाच्या घरकुलाची वाट पाहत न बसता हक्काचं पक्क घरकुल मिळणार आहे. सामाजिक दायित्व ठेवणाऱ्या या सहहृदयी लोकांप्रमाणेच इतरही गावाने अशाप्रकारे सहकार्यातून मदत केल्यास एकही मायमाऊली निराधार राहणार नाही ही शिकवण या अकोल्याच्या आपातापा गावाने दिली आहे.