हवामान अंदाज महाराष्ट्र: Heat Wave Alert : राज्यासाठी पुढचे ४ दिवस धोक्याचे, ‘या’ भागात भयंकर उष्णता वाढणार – heat wave continues in the district for the next four days in the state
जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून आलेली उष्णतेची लाट कायम आहे. येत्या दोन दिवसांत जळगाव जिल्ह्याचा कमाल तापमानाचा पारा ४५ अंशांवर जाण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. सोमवारी तापमान ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
गेल्या दीड महिन्यात विदर्भ-मध्य महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत तीन उष्णतेच्या लाटा येऊन गेल्या आहेत. अद्याप मे महिना शिल्लक असून, उष्णतेची मोठी लाट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात १६ मार्चपासून कमाल तापमान ४० अंशांवर कायम आहे. मार्च व एप्रिल या दोन्ही महिन्यांत आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान राहिले आहे. राजस्थान, गुजरातकडून उष्ण वारे
भारतातील पश्चिम-उत्तर भागात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र कमी झाले असून, आता पुन्हा कोरडे व उष्ण वारे राजस्थान व गुजरातकडून पुन्हा सक्रिय होऊन महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसांत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. यंदा मागील शंभर वर्षांतील सर्वात उष्ण लाटा अनुभवास येत असून, मे महिन्यात उष्णतेचा तडाखा अधिक असेल.