नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-अ खाली दोन समुदायांत तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. तसंच नंतर पोलिसांनी राजद्रोहाचे १२४-अ हे कलमही वाढवले. या प्रकरणात कोर्टाने तात्काळ दिलासा देण्यासाठी नकार दिल्याने राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला. अशातच मी मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी मला प्यायला पाणीही दिलं नाही, असा आरोप करत नवनीत राणा यांनी लोकसभेच्या सभापतींना पत्र लिहिलं.
नवनीत राणा यांनी लिहिलेल्या पत्राबाबत बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, ‘लोकसभा सभापतींनी घडलेल्या घटनेविषयी माहिती मागवली आहे. ही माहिती आम्ही लवकरच त्यांना देऊ.’
दरम्यान, महाराष्ट्रात पोलिसांच्या मदतीने सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आमच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. या आरोपावरही गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. ‘पोलीस कायद्यानेच कारवाई करतात. कायद्याच्या बाहेर जाऊन कोणीही निर्णय घेत नाही. आतापर्यंत झालेली कारवाई कायद्यानेच झाली असून ती योग्य आहे,’ असं गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.