पुणे शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून शुक्रवारी सायंकाळी पाचवाजेपर्यंत ३६ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यात पिंपरी चिंचवडमध्ये नव्याने चार जणांना लागण झाली आहे. पुणे शहर व जिल्ह्यांत आतापर्यंत एकूण २४५ जणांना करोनाची लागण झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार नाहीत
करोनाबाधीत रुग्णाचे निधन झाल्यास संबधित रुग्णांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार नाहीत. त्या मृतदेहांवर गॅस किंवा विद्युत दाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोरोनाबाधीत रुग्णाचा मृतदेह दफन करायचा असल्यास शहरापासून दूर अंतरावर सहा फूट खोल खड्डा खणून आणि त्यामध्ये निर्जंतूक लिक्विड टाकून मृतदेह प्लास्टिकच्या दोन बॅगांमध्ये घालून दफन केला जाणार आहे, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
पुण्यातील आजचे अपडेट्स…
– घराबाहेर पडताना तोंडावर मास्क लावणे पुण्यात बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची माहिती देणारा व्हिडिओ पुणे पोलिसांनी तयार केला असून त्यामधून नागरिकांची जनजागृती केली जात आहे.
– संचारबंदीच्या काळात रुग्णांना सेवा देण्यासाठी आपल्या खासगी क्लिनिकमध्ये जाणाऱ्या डॉक्टरांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना नाकाबंदीमध्ये अडवून ठेवू नका. डॉक्टरांचे ओळखपत्र पहावे तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना संबधित डॉक्टरांनी दिलेले पत्र ग्राह्य धरून त्याची शहानिशा करून सोडावे, अशा सूचना वाहतूक विभागाचे अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिल्या आहेत.
– मार्केट यार्डातील भाजीपाला, फळे, कांदा, बटाटा बाजार शुक्रवारपासून बंद करण्यात आल्यानंतर आता त्यापाठोपाठ येत्या १३ एप्रिलपासून मार्केट यार्डातील गुळ व भुसार विभाग पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय दि पूना मर्चंट चेंबरने घेतला आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील भुसार विभागही आता बंद राहणार आहे.
– नाकाबंदी व चौकात तपासणी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची आठवण करून देण्यासाठी एका तासाला घंटानाद केला जात आहे. झोन तीनच्या १७ नाकाबंदीच्या ठिकाणी हा उपक्रम राबविला जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times