अभिव्यक्ती आणि मुक्तपणे मते मांडण्यावरून ”ला लक्ष्य करणारे यांनी अखेर, या प्रभावशाली समाज माध्यमावर ताबा मिळविला आहे. तब्बल ४४ अब्ज डॉलरला ‘ट्विटर’ खरेदी करून त्यांनी याबाबत गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मस्क अग्रस्थानी आहेत. त्यांची एकूण मालमत्ता २६९.७ अब्ज डॉलर असून, ती काही देशांच्या एकूण उत्पन्नापेक्षा (जीडीपी) अधिक आहे. इतकी मोठी संपत्ती एकवटलेल्या या व्यक्तीकडे आता अतिशय प्रभावशाली असे समाज माध्यम येत आहे. काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी ‘ट्विटर’मधील नऊ टक्के समभाग विकत घेतले होते. एक समाज माध्यम आपण स्वत:च उभारणार असल्याची भाषा मस्क यांनी यापूर्वी केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘ट्विटर’मधील समभाग विकत घेतल्याने ते या कंपनीवर ताबा मिळविणार अशी चिन्हे होतीच. ‘ट्विटर’ खरेदीबाबत काही बाबी समोर आल्या आहेत, तर काही अजून स्पष्ट झाल्या नाहीत. आर्थिक व्यवहाराचा तपशील हळुहळू बाहेर येईल. ‘ट्विटर’च्या खरेदीत ‘अर्थ’ कळीचा असला, तर त्यात वेगवेगळे अर्थही दडले आहेत. एक मोठे समाज माध्यम विकले जाताना त्याकडे व्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहणे योग्य नाही. ‘ट्विटर’ची खरेदी हा केवळ आर्थिक व्यवहाराचा मुद्दा नाही; अभिव्यक्तीचा आणि विचारसरणीचा मुद्दाही त्यात आहे. मस्क यांनी ‘ट्विटर’ विकत घेण्यामागे आर्थिक लाभ-हानीचा विचार नक्कीच केला असणार; परंतु त्याखेरीज यामागे विचारसरणीच्या नियंत्रणाचाही हेतू असू शकतो काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

या प्रश्नाचे थेट उत्तर मस्क यांनी अद्याप दिलेले नाही. ‘ट्विटर’बाबत त्यांनी काही भाष्य वेळोवेळी केले आहे. त्याचबरोबर अलीकडे काही मतेही मांडली आहेत. ‘लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. डिजिटल क्षेत्रात ‘ट्विटर’ यासाठी व्यासपीठ देते. तिथेही मुक्त अभिव्यक्तीची संधी मिळायला हवी,’ हे मस्क यांचे विधान त्यांचा हेतू स्पष्ट करणारे आहे. ‘ट्विटर’वर कोणालाही आपले मत मुक्तपणे मांडता यावे, त्यांच्यावर निर्बंध घातले जाऊ नयेत, असे मस्क यांना सुचवायचे आहे. ‘ट्विटर’वर जी मते मांडली जातात, ती वापरणाऱ्यांना विशिष्ट क्रमाने दिसतात. वापरणारे ज्यांना ‘फॉलो’ करतात, ज्यांना भरपूर पाठीराखे आहेत, जे सतत मत मांडतात अशा अनेक निकषांच्या आधारे हा क्रम व्यक्तीनिहाय दिसतो. त्यासाठी कार्यप्रणाली (अल्गोरिदम) असते. ही कार्यप्रणाली खुली करण्याचा विचारही मस्क यांनी मांडला आहे. या पारदर्शकतेमुळे ‘ट्विटर’च्या कार्यप्रणालीचा अभ्यास करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता येऊ शकेल; यामुळे ‘ट्विटर’ची परिणामकारताही वाढेल. मस्क यांच्या मालकीहक्काखाली ‘ट्विटर’चे धोरण कसे असू शकेल, याची कल्पना यातून येते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मस्क उच्चरवाने पुरस्कार करीत असल्याने ‘ट्विटर’ अधिक खुली आणि पारदर्शक होईल असे वाटत असले, तरी याकडे सावधतेने पाहिले जात आहे. अनेकांना याबाबत शंकाही आहेत.

सुमारे चाळीस कोटीहून अधिक लोक ट्विटरचा वापर करीत असून, या माध्यमाद्वारे दररोज व्यक्त होणाऱ्यांची संख्या सोळा कोटींहून अधिक आहे. समाजावर प्रभाव पाडू शकणाऱ्या या माध्यमाचे नियंत्रण एकाच व्यक्तीकडे येणार असल्याने या शंका रास्त म्हणाव्या लागतील. समाज माध्यमांद्वारे प्रचार मोहिमा राबवून जनमानसाला मोहित करण्याचा प्रकार अनेक देशांत होतो आहे. खऱ्या-खोट्या माहितीचे मिश्रण करून अपप्रचार आणि अफवाही पसरविल्या जातात. डावे, उजवे, धार्मिक मूलतत्त्ववादी, उदारमतवादी अशा विविध विचारसरणींचे लोक समाज माध्यमांचा उपयोग समाजमन घडविण्यासाठी करीत असतात. समाज माध्यमांच्या साह्याने सरकारे उलथवून टाकण्याचे किंवा विशिष्ट विचारांचे सरकार सत्तेवर आणण्याचे प्रकारही घडत आहेत. अशा स्थितीत समाज माध्यमांच्या नियंत्रकांना अतिशय सावध राहणे, त्या-त्या देशांतील नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. समाजात तेढ किंवा दुफळी निर्माण करणारा किंवा द्वेषभावना वाढीस लावणारा आशय जर कोणी मुक्त अभिव्यक्तीच्या नावाखाली समाज माध्यमावर टाकत असेल, तर त्यांना रोखायलाच हवे. याबाबतचा आग्रह वाढल्यानंतर ‘ट्विटर’ने काहींना रोखले आहे. काहींचे ‘ट्विट’ हटविले आहे. मस्क यांची मुक्त अभिव्यक्तीची भाषा योग्य आहे; परंतु द्वेषमूलक आणि चुकीची माहिती देणाऱ्यांना रोखण्याबद्दल ते अद्याप बोललेले नाहीत. डाव्या आणि उजव्या या टोकाच्या विचारसरणीचे प्रत्येकी दहा टक्के लोक नाराज असले, तर समाज माध्यमाचे धोरण चांगले म्हणता येईल, असे मत त्यांनी जरूर नोंदविले आहे. माझ्या कडवा विरोधकही ‘ट्विटर’वर राहायला हवा; कारण यातूनच मुक्त अभिव्यक्ती दिसते, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबतचे मुद्दे त्यांनी अधिक उलगडून सांगितले, तर त्यांच्या काळातील ‘ट्विटर’धोरणाचा अंदाज येऊ शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here