उल्हासनगर : उल्हासनगरात एका साडेचार वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुलाच्या आईसोबत झालेल्या वादाच्या रागातून मुलाची हत्या केल्याचे तपासात उघड झाले असून, याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून आरोपी कांचनसिंग पासी याला अटक केली आहे. (Ulhasnagar Murder Case)

उल्हासनगरच्या कॅम्प २ मधील हनुमान नगर परिसरात २४ वर्षीय कांचनसिंग आणि मृत मुलाचे कुटुंब वास्तव्याला आहे. पीडित मुलाची आई आणि कांचनसिंग हे दोघेही उल्हासनगर येथील एका बिस्किट कारखान्यात एकत्र कामाला होते. १६ एप्रिल रोजी कांचनसिंग आणि मृत मुलाची आई यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर २० एप्रिल रोजी कांचनसिंग याने साडेचार वर्षांच्या या चिमुकल्याला आईस्क्रीम देण्याचा बहाणा करत आपल्यासोबत नेले. त्यानंतर अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात एका झाडाझुडपात नेऊन त्या चिमुकल्याची गळा दाबून हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह तिथेच टाकून कांचनसिंग उत्तर प्रदेशात त्याच्या मूळ गावी पळून गेला. मात्र अचानक मुलगा बेपत्ता झाल्याने घाबरलेल्या मुलाच्या आई-वडिलांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यामध्ये मुलगा हरवल्याची तक्रार दिली. त्याचवेळी ऑर्डनन्स परिसरात अंबरनाथ पोलिसांना एका लहान मुलाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह अपहरण झालेल्या मुलाचाच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला.

Mumbai Local : गर्दीत लोकलमधून पडलेल्या व्यक्तीला मिळणार नुकसान भरपाई; तब्बल ११ वर्षांनंतर दिलासा

या हत्येनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता मुलाच्या आईचे आरोपी कांचनसिंग याच्यासोबत चार दिवसांपूर्वी भांडण झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी कांचनसिंगचा शोध घेतला असता तो उत्तर प्रदेशमध्ये असल्याचे समजताच उल्हासनगर पोलिसांच्या तपास पथकांनी उत्तर प्रदेशात जाऊन प्रयागराज इथून कांचनसिंग पासी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता आपणच या साडेचार वर्षांच्या मुलाचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार त्याच्याविरोधात अपहरण, हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here