काँग्रेसमधील नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत किशोर पंतप्रधानपदाचा उमेदवार आणि पक्षाचा अध्यक्ष यासाठी दोन स्वतंत्र व्यक्तींची निवड करण्यात यावी, असं म्हटलं होतं. प्रियांका गांधी यांच्याकडे पक्षाचं अध्यक्षपद देण्यात यावं, असा प्रस्ताव किशोर यांनी मांडला होता. मात्र, काँग्रेसची भूमिका ही राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष असतील अशी होती.
प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची निर्णय प्रक्रिया जलद करण्यासंदर्भात आणि निवडणूक रणनीती तयार करण्यासाठी स्वतंत्र टीम आणि संघटनात्मक व्यवस्थापनाची गरज असल्याचं म्हटलं होत. मात्र, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी याला विरोध दर्शवल्याची माहिती आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एक ट्विट करत प्रशांत किशोर यांनी सादरीकरण केल्यानंतर एक समिती बनवण्यात आल्याची माहिती दिली. या समितीमध्ये प्रशांत किशोर यांना सहभागी होण्यास आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, प्रशांत किशोर यांनी नकार दिल्याची माहिती सुरजेवाला यांनी दिली. प्रशांत किशोर यांनी आमच्या पक्षाला दिलेल्या सूचनांचं आम्ही स्वागत करतो, असं सुरजेवाला यांनी म्हटलं होतं.
प्रशांत किशोर यांनी ट्विट करत काँग्रेसनं पक्षात प्रवेश करण्याची दिलेली ऑफर नाकारली असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाला माझ्या ऐवजी नेतृत्त्व आणि सामुदायिक इच्छाशक्तीची गरज आहे. काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीत बदल करण्याची गरज असल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.