किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी शहरातील एका पोलीस ठाण्यासमोर दगडफेक करण्यात आली. यावेळी काच फुटल्यानंतर सोमय्या यांच्या हनुवटीला जखम झाली होती. ही जखम ०.१ सेमीची होती, तसंच रक्तस्त्राव झाला नव्हता, असं वैद्यकीय तपासणीच्या अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते. हा अहवाल रुग्णालयाकडून मुंबई पोलिसांना देण्यात आल्याचीही माहिती आहे.
वैद्यकीय अहवाल समोर आल्यानंतर आता राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना नेते संजय राऊत यांनी याआधीच सोमय्या यांच्यावर निशाणा साधत ते चेहऱ्याला टोमॅटो सॉस लावून फिरत असल्याची टीका केली होती.
सोमय्या राज्यपालांना भेटणार
एकीकडे, भाभा रुग्णालयातील वैद्यकीय अहवालातून सोमय्या यांना झालेली जखम गंभीर नसल्याचा अहवाल देण्यात आलेला असतानाच आज किरीट सोमय्या यांच्यासह भाजपचे काही नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. या भेटीत भाजप नेत्यांकडून राज्यपालांकडे काय मागणी केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.