ठाणे: ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील भाजी मंडई, भाजीपाला बाजार, फळ बाजार तसेच फळे व भाजीपाला दुकाने आज मध्यरात्रीपासून मंगळवार दि. १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

संचारबंदीच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांना बाहेर जाण्याची सूट देण्यात आलेली होती. मात्र, ठाणे जिल्ह्यातील सर्व भाजी मंडईंमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आढळून येत होती. तसेच सुरक्षित अंतराचे नियमही पाळले जात नव्हते. त्यामुळे वारंवार संचारबंदी आदेशाचा भंग होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. वेळोवेळी याबाबत नागरिकांना आवाहन तसेच कायदेशीर कारवाई करूनही लोकांच्या वर्तनात फरक न पडल्याचे निदर्शनात आल्यावर खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने भाजी मंडई, भाजीपाला बाजार, फळ बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हे आदेश फक्त महापालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांसाठी लागू असतील. त्याचे उल्लंघन केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील ५१ (ब) रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार दंडनीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिला आहे.

अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाडच्या सीमा सील

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक खबरदारीची उपाय म्हणून अंबरनाथ व कुळगाव नगरपरिषद आणि मुरबाड, शहापूर नगरपंचायत क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या सर्व बाजूंच्या चतुःसीमा आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण सार्वजनिक वाहतुकीस १० एप्रिल पासून पुढील आदेशापर्यत प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. साथ रोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ हा ठाणे जिल्ह्याच्या संपूर्ण क्षेत्रासाठी लागू करण्यात आलेला आहे. या काळात या भागातून कोणत्याही प्रकारची सार्वजनिक वाहतूक रस्त्यावर, गल्लोगल्ली करण्यास सक्त मनाई आहे. यामध्ये सर्व प्रकारची दुचाकी वाहने, तीनचाकी वाहने, रिक्षा, हलकी चार चाकी वाहने तसेच सर्व प्रकारच्या टॅक्सी आदी वाहनांचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू व सेवा तसेच परवानगी दिलेल्या ऑन कॉल रिक्षा, आपत्ती व्यवस्थापन वाहने, मीडीया, विविध परवानगी दिलेल्या आस्थांपनांची वाहने, पाण्याचे टँकर यामधून वगळण्यात आले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here