जिल्ह्यात एकूण ५७६ ग्रामपंचायती असून यातील ४७६ ग्रामपंचायतीत जलशक्ती अभियानांतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतींमधून तसेच इतर शासकीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र इमारती असल्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार यासंदर्भात ग्रामसभेत ठराव घेण्याबाबतही कळवण्यात आले होते.
हिंगोलीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व ५६३ ग्रामपंचायतींमधून नुकत्याच ग्रामसभा घेण्यात आल्या. या ग्रामसभेत चालू आर्थिक वर्षात राबवण्यात येणाऱ्या संकल्पना यांची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली.
अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी त्यांच्या घरावर पडणारे पाणी भूगर्भात साठवण्यासाठी वॉटर हार्वेस्टिंग करण्याचेही जाहीर केले. त्यानुसार प्रत्येक गावात किती गावकऱ्यांकडे पक्की घरे आहेत, याचे सर्वेक्षण करून पुढील कामं हाती घेण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे.