अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून बच्चू कडूंनी १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचितने केला होता. या संदर्भात वंचितनं राज्यपालांकडे बच्चू कडू यांच्यावर कारवाईसाठी परवानगी मागितली होती. आता न्यायालयाने या प्रकरणात अपहार झाल्याचं प्राथमिक मत नोंदवत गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
यानुसार, रात्री उशिरा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर करून तो निकाली काढत थेट सिटी कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवेधन पुंडकर यांनी दिली. यावेळी त्यांचे वकील ऍड. आशिष देशमुख हे उपस्थित होते.
दरम्यान, निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीबद्दल खोटी माहिती दिल्याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात न्यायालयाने निकाल देत राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्याची शिक्षा व २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर आता आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने बच्चू कडू अडचणीत सापडले आहेत.
‘या’ तीन रस्त्यांच्या कामात अपहाराचा आरोप…
गायगाव ते रिधोरा रस्त्याला जोडणारा लहान पुल आणि पोचमार्गाच्या कामात ५० लाखांच्या अपहाराचा आरोप करण्यात आला. इतर जिल्हा मार्गाला (इजिमा) जोडणाऱ्या धामना ते नवीन धामना जोड रस्ता सुधारणेच्या कामात २० लाखांच्या अपहाराचा आरोप, कुटासा ते पिंपळोद मार्गाला जिल्हा मार्ग असल्याचं दाखवत यासाठी निधी वळवता करीत १ कोटी २५ लाखांच्या अपहाराचा आरोप वंचितने केला आहे.