मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना होण्यापूर्वी गृहमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासोबतही चर्चा केली असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर राजद्रोहाच्या गुन्ह्यात अटकेत असणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. मी मागासवर्गीय असल्याने कोठडीत पोलिसांनी हीन वागणूक दिल्याचा दावा राणा यांनी केला होता. नवनीत राणा यांच्या या आरोपानंतर काल पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर मुंबई पोलिसांकडून राणा यांना योग्य वागणूक दिली गेल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आज पांडे यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीत संजय पांडे यांनी पोलिसांवर होणाऱ्या आरोपाबाबत गृहमंत्र्यांकडे सविस्तर स्पष्टीकरण दिले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, एकीकडे नवनीत राणा यांनी पोलिसांवर आरोप केलेले असतानाच दुसरीकडे आज माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह भाजपचे काही नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवरही मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये होणाऱ्या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे.